Blue Moon 2023: यंदा 30 ऑगस्टच्या रात्री दिसणार वर्षातील एकमेव 'ब्लू मून'; जाणून घ्या नक्की काय आहे ही दुर्मिळ खगोलीय घटना
Blue Moon (संग्रहित संपादित प्रतिमा)

या महिन्यात 30-31 ऑगस्टच्या रात्री अंतराळात एक दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे. या घटनेला वैज्ञानिक भाषेत ‘सुपर ब्लू मून’ (Blue Moon) किंवा ‘सुपरमून’ म्हटले जात आहे. या दिवशी चंद्र इतर सर्व दिवसांपेक्षा मोठा आणि तेजस्वी दिसेल. ही घटना दर दोन ते तीन वर्षांतून एकदा घडते. यंदा 2023 मध्ये ही घटना अनुभवायला मिळणार आहे. या दिवशी, शनी देखील चंद्राच्या संयोगाने सर्वात तेजस्वी तारा म्हणून दिसेल.

नासाच्या शास्त्रज्ञांच्या मते, 30-31 ऑगस्टच्या रात्री 12.56 वाजता चंद्र पृथ्वीपासून सर्वात जवळच्या अंतरावर असेल. या वेळी तो खूप तेजस्वी आणि खूप मोठा दिसेल. यावेळी चंद्र पृथ्वीपासून फक्त 2,22,043 मैल दूर असेल. खगोलशास्त्रीय गणनेनुसार, ब्लू मूनची घटना दर दोन ते तीन वर्षांतून एकदा येते. तो फेब्रुवारी वगळता वर्षाच्या 12 महिन्यांपैकी कोणत्याही महिन्यात दिसू शकतो. फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असल्याने त्या महिन्यात ब्लू मून कधीच दिसत नाही. जेव्हा फेब्रुवारी महिन्यात पौर्णिमा नसते तेव्हा त्याला ब्लॅक मून म्हणतात.

वैज्ञानिक परिभाषेनुसार, जेव्हा एका महिन्यात दोनदा पौर्णिमा येते, तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेला दिसणार्‍या चंद्राला ‘ब्लू मून’ म्हणतात. याशिवाय, जेव्हा एका वर्षात 12 ऐवजी 13 पौर्णिमा असतात, तेव्हा 13 व्या पौर्णिमेला दिसणार्‍या चंद्रालाही ब्लू मून असेही म्हणतात. काही लोकांना असे वाटू शकते या दिवशी चंद्र निळ्या रंगाचा दिसतो, मात्र तसे नाही. तो फक्त इतर दिवसांपेक्षा जास्त मोठा आणि तेजस्वी दिसतो.

29 ऑगस्ट 2023 (मंगळवार) रोजी चंद्रोदय संध्याकाळी 7:28 वाजता होईल आणि चंद्रास्त बुधवारी सकाळी 6:30 वाजता होईल. त्यानंतर 30 ऑगस्ट 2023 (बुधवार) रोजी रात्री 8:08 वाजता चंद्रोदय होईल आणि चंद्रास्त गुरुवारी सकाळी 7:42 वाजता होईल. 31 ऑगस्ट 2023 (गुरुवार) रोजी चंद्रोदय रात्री 8:44 वाजता होईल आणि चंद्रास्त शुक्रवारी सकाळी 8:51 वाजता होईल. (हेही वाचा: Apple Alert: झोपताना iPhone जवळ ठेवून चार्ज करत असाल तर व्हा सावध; कंपनीने जारी केला इशारा)

ऑगस्ट महिन्यात केवळ सुपरमून किंवा ब्लू मूनच दिसणार नाही, तर या महिन्यात शनि ग्रहही पृथ्वीवरून स्पष्टपणे दिसणार आहे. वैज्ञानिक गणनेनुसार शनी सध्या पृथ्वीच्या जवळ आहे व तो 27 ऑगस्ट रोजी पृथ्वीपासून सर्वात जवळच्या अंतरावर येईल. त्यावेळी तो चंद्रासह आकाशात दिसेल.