फाल्गुन शुक्ल पोर्णिमेच्या दिवशी होलिका दहन (Holika Dahan) केले जाते. यंदा होळीचा सण बुधवार 20 मार्च दिवशी होणार आहे. यंदाची होळी पौर्णिमा (Holi Fullmoon) विशेष आहे कारण यंदा वर्षातलं शेवटच सुपरमून (Supermoon ) दर्शन होळीच्या दिवशी आलं आहे. त्यासोबतच हा दिवस 'विषुवदिन'(Spring Equinox) देखील आहे. ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीपासून चंद्र सरासरी 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येत असेल तर चंद्रबिंब 14 टक्के मोठे आणि 30 टक्के जास्त प्रकाशित दिसते. यंदा होळी पौर्णिमेदिवशी चंद्र पृथ्वीच्या 3 लाख 59 हजार 377 किलोमीटर अंतरावर येणार आहे.
कधी आणि कसा पहाल सूपरमून?
होळी पौर्णिमेच्या (20 मार्च) संध्याकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी चंद्र उगवणार आहे.हा चंद्र रात्रभर आकाशात असेल दुसर्या दिवशी म्हणजे गुरूवारी (21 मार्च) सकाळी 7 वाजून 1 मिनिटांनी मावळेल. त्यामुळे यंदाच्या वर्षातलं हे सूपरमूनचं दर्शन पहायला अनेक खगोलप्रेमी गर्दी करणार आहेत. यापूर्वी 2011 साली होळी आणि सूपरमुन हा योग आला होता. आता पुन्हा 2028 साली होळी आणि सूपरमून एकत्र येणार दिसणार आहे.
यंदा 20 मार्च होळीच्या उत्तररात्री विषुवदिन असल्यानेही रात्र आणि दिवस समान असणार आहे. 'विषुवदिन' (21 मार्च ) म्हणजे ज्या दिवशी सूर्य उत्तर गोलार्धामध्ये प्रवेश करतो.