Samsung ने लॉंंच केला फोल्डेबल फोन; तब्बल 6 कॅमेरे, 1 लाख 41 किंमत जाणून घ्या इतर फीचर्स
गॅलेक्सी फोल्ड (Photo Credit : Youtube)

स्मार्टफोन क्षेत्रात होत असलेली क्रांती पाहता लवकरच ग्राहक 5 जीचा लाभ घेऊ शकतील. यासोबत अजून एका गोष्टीची प्रतीक्षा होती ती म्हणजे फोल्डेबल स्मार्टफोन (Foldable Smartphone). ऐकायला थोडी विचित्र वाटत असलेली ही कलपना, प्रत्यक्षात अवतरू शकते याचा कोणी विचारही केला नसेल. मात्र गेले काही महिने अनेक मोठमोठ्या कंपन्या यावर काम करत होत्या, आता दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग (Samsung)ने आपला नवीन फोल्डेबल फोन सादर केला. हा जगातील फुलफ्लेजेड पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असणार आहे. बुधवारी सॅन फ्रान्सिसकोमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या फोनची झलक दाखवण्यात आली. गॅलेक्सी फोल्ड (Galaxy Fold) असे या फोनचे नाव असून, याची किंमत 1,980 डॉलर म्हणजे 1 लाख 41 हजार इतकी आहे. येत्या 26 एप्रिलपासून हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. चला पाहूया काय आहेत या नवीन फोल्डेबल फोनची वैशिष्ठ्ये.

> टॅबलेट आणि स्मार्टफोन अशी दोन्ही कामे करणाऱ्या या फोनला दोन डिस्प्ले असणार आहेत. एक आतील बाजूला तर दुसरा बाहेरील बाजूला. याचा मुख्य डिस्प्ले 7.3 इंचाचा आहे तर दुय्यम डिस्प्ले 4.58 इंचाचा असणार आहे. (हेही वाचा: Samsung ने लाँच केला तब्बल 2 लाखाचा Flip Phone W2019; पाहा काय आहेत फीचर्स)

> या फोनला दोन बॅटरी असणार आहे. या बॅटरीज 4,380 Mh क्षमतेच्या आहेत.

> या फोनमध्ये 6 कॅमेरा असणार आहेत. पाठीमागे 16,12, 12MP चे तीन कॅमेरे, याबरोबरच 10 MP आणि 8 MP चे दोन कॅमेरे सेल्फीसाठी आणि एक 10 MP कॅमेरा फोल्डेबल फ्रंटवर देण्यात आला आहे.

> या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7nm प्रोसेसर, 12 जीबी रॅम आणि 512 GB स्टोरेज देण्यात आले आहे.

> यूएफएस 3.0 ला सपोर्ट करणारा हा पहिलाच स्मार्टफोन आहे. या फोनमध्येआपण एकाच वेळी तीन-तीन अॅप वापरू शकतो. तसेच सध्या हा फोन ब्लॅक, सिल्व्हर, ग्रीन आणि ब्ल्यू अशा चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.

सॅमसंगने केलेल्या दाव्यानुसार हा फोन कमीत कमी 200,000 वेळा फोल्ड करू शकतो, म्हणजे दिवसातून 100 वेळा जरी फोल्ड केला तरी 5 वर्षे हा फोन चालेल.