Apple च्या उत्पादनांना टक्कर देता देता सॅमसंग (Samsung)ला नाकी नऊ आले आहे. बाजारात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कंपनीने सर्व प्रकारच्या युक्त्या वापरल्या. याचसाठी सॅमसंगने फोल्डेबल फोनचीदेखील घोषणा केली होती. मात्र अजूनही कंपनीने या घोषणेवर कोणतेही पाऊल उचललेले नाही. मात्र आता सॅमसंगने नवा Flip Phone W2019 फोन लाँच करून बाजारात हवा केली आहे. हा फोन गेल्या वर्षी लाँच केलेल्या W2018 Flip Phone चे अद्ययावत मॉडेल आहे. आणि या फोनची किंमत तब्बल 1,98,890 लाख रुपये आहे. चला तर पाहूया नक्की काय आहे हा जवळजवळ 2 लाखाचा फोन.
अॅल्युमिनियम बॉडी असलेल्या या फोनला डायमंड-कट फिनिश देण्यात आले आहे. हा फोन 17.3mm इतका जाड असून याचे वजन 257 gm इतके आहे. सध्या हा फोन सिल्व्हर आणि गोल्ड अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फोनला 4.2 इंचाचा S-AMOLED FHD डिस्प्ले देण्यात आला असून, अँड्रॉईड 8.1 ओरिओची ऑपरेटिंग सिस्टिमवर हा फोन चालेल.
Flip Phone W2019 ला दोन नवीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. पहिले 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस. तर दुसरे व्हेरिअंट 6 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असे आहे. या फोन मध्ये 12 मेगापिक्सलचा कॅमेरा तर फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये फुल एचडी स्लो-मोशन व्हिडिओ रेकॉडिंगही करता येते.
या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट देण्यात आला आहे. माइक्रोएसडी कार्डचा स्लॉट देण्यात आलेला नाही. फोनची बॅटरी 3070 एमएएचची इतकी देण्यात आली आहे, जी 85 तासांचा स्टँडबाय टाईम आणि 280 तासांचा टॉकटाईम देण्य़ास सक्षम आहे.
हा फोन कंपनीच्या अगदी दुर्मिळ flip phone सिरीजमधील आहे, की जे अगदी ठराविक बाजारातच उपलब्ध आहेत उदा – साउथ कोरिया. या फोनला सध्या चीनमध्येच लाँच करण्यात आलेले असले तरीही अन्य बाजारांत कधी लाँच केले जाईल याबाबत स्पष्टता नाही. या फोनची चीनमधील सुरुवातीची किंमत 18999 चीनी युआन म्हणजेच 1,98,890 भारतीय रुपये एवढी आहे.