तुमच्या युपीआय (UPI) आयडीबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोरआली आहे. सर्व बँका आणि फोनपे (PhonePe), गुगल प्ले (Google Pay) सारखे थर्ड पार्टी अॅप्स निष्क्रिय युपीआय आयडी बंद करणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India- NPCI) ने सर्व बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सना असे आयडी ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यात एका वर्षापासून कोणताही व्यवहार झाला नाही. यासाठी एनपीसीआयने 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे जर तुमचा आयडी निष्क्रिय असेल तर, कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबरपर्यंत तुमचा युपीआय आयडी सक्रिय करा.
युपीआय आयडी निष्क्रिय करण्यापूर्वी बँक वापरकर्त्यांना ईमेल किंवा संदेशाद्वारे सूचना पाठवेल. एनपीसीआयच्या या निर्णयामुळे युपीआय व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील, याशिवाय चुकीचे व्यवहारही थांबतील.
एनपीसीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व थर्ड पार्टी अॅप्स आणि पीएसपी (PSP) बँका निष्क्रिय ग्राहकांचा युपीआय आयडी आणि त्याच्याशी संबंधित मोबाइल नंबरची पडताळणी करतील. एका वर्षापासून या आयडीवरून कोणत्याही प्रकारचे व्यवहार झाले नसल्यास ते बंद केले जाईल. नवीन वर्षापासून ग्राहकांना या आयडीवरून व्यवहार करता येणार नाहीत.
एनपीसीआयने अशा युपीआय आयडी ओळखण्यासाठी बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सना 31 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांद्वारे, एनपीसीआय हे सुनिश्चित करू इच्छित आहे की, पैसे चुकीच्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाणार नाहीत किंवा त्याचा गैरवापर होणार नाही. अलीकडच्या काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. (हेही वाचा: Child Sex Abuse Case: मेसेजिंग अॅप Telegram सह Paytm, PhonePe वर गुन्हा दाखल; बाल लैंगिक शोषण कंटेंटचा प्रचार केल्याचा आरोप)
अनेक वेळा लोक आपला मोबाईल नंबर बदलतात आणि त्याच्याशी संबंधित यूपीआय आयडी निष्क्रिय करायला विसरतात. अनेक दिवस तो नंबर बंद असल्याने तो दुस-या कोणाला तरी मिळतो. परंतु, या क्रमांकाशी जोडलेला जुना युपीआय आयडी तसाच जोडलेला असतो, अशा परिस्थितीत चुकीचे व्यवहार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.