आता WhatsApp च्या माध्यमातून Transfer करू शकाल पैसे; NPCI ने दिली परवानगी
WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

आपण आता भारतामध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) माध्यमातून पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करू शकणार आहात. व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अहवालानुसार, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय आधारित सिस्टम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. एनपीसीआयने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, फेसबुकच्या मालकीची कंपनी व्हॉट्सअ‍ॅप यूपीआय वर जास्तीत जास्त 20 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्याचा आधार घेऊन वर्गीकृत पद्धतीने आपला यूपीआय यूजर बेस वाढवू शकते.

महत्त्वाचे म्हणजे यावर्षी जूनमध्ये व्हॉट्सअॅपने पेमेंट सर्व्हिस सुरू केली होती. परंतु हे फिचर वापरण्याची संधी केवळ काही वापरकर्त्यांनाच मिळाली. आता एनपीसीआयने मर्यादित संख्येसह व्हॉट्सअॅपवर पैसे हस्तांतरित करण्यास परवानगी दिली आहे. यापुढे कंपनी आपली व्याप्ती वाढवेल. व्हॉट्सअॅप फक्त याच मंजुरीची वाट पाहत होता, कारण त्याने आधीपासूनच या फिचरची चाचणी घेतली आहे. आता लवकरच पेमेंटचा पर्याय व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध होईल. (हेही वाचा: WhatsApp कडून Store Management Tool लॉन्च, अनात्यावश्यक फाइल्स डिलिट करणे होणार सोप्पे)

2008 मध्ये भारतातील रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम चालविण्यासाठी एक एकत्रित संस्था म्हणून एनपीसीआय समाविष्ट केली गेली. एनपीसीआयने देशात एक मजबूत पेमेंट आणि सेटलमेंट इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे. यामुळे रुपे कार्ड, त्वरित पेमेंट सर्व्हिस (IMPS), युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM), भीम आधार, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल यांसारख्या किरकोळ पेमेंट उत्पादनांद्वारे भारतात पेमेंट करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे.

दरम्यान, गुरुवारी, व्हॉट्सअॅपने सांगितले की ते लवकरच ‘आपोआप पुसले जाणारे संदेश’ (Disappearing Messages) फिचर सादर करीत आहेत, यामुळे चॅटमधील नवीन मेसेजस सात दिवसांनंतर अदृश्य होतील. या महिन्यात सर्व वापरकर्त्यांसाठी हे फिचर आणले जाईल.