फेसबुकची मूळ कंपनी मेटा (Meta) मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरशी (Twitter) स्पर्धा करण्यासाठी एका नवीन प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. मेटा टेक्स्ट-बेज्ड कंटेंट शेअर करण्यासाठी ट्विटरसारखे नवे सोशल मीडिया अॅप तयार करत आहे. रिपोर्टनुसार, सूत्रांनी सांगितले की या प्रोजेक्टचे कोडनेम 'P92' आहे, ज्यामध्ये वापरकर्ते त्यांच्या विद्यमान इंस्टाग्राम क्रेडेंशियल्ससह लॉग इन करू शकतात. हे आगामी अॅप इंस्टाग्राम अंतर्गत ब्रँड केले जाईल.
कंपनीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, ते लोकांना मजकूर शेअर करण्यासाठी स्वतंत्र विकेंद्रित सोशल नेटवर्कवर काम करत आहेत. कंपनीच्या मते हा एक खास, वेगळा प्लॅटफॉर्म असेल जिथे क्रिएटर्स आणि पब्लिक सेलेब्रिटी त्यांच्या आवडीबद्दल माहिती शेअर करू शकतील. सध्या तरी मेटाच्या या नवीन अॅपच्या विकासाचे काम सुरू झाले आहे की नाही हे माहीत नाही. परंतु रिपोर्टनुसार, कंपनीने आधीच या अॅपवर काम करणे सुरू केले आहे.
इंस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी या प्रकल्पाचे नेतृत्व करत असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, P92 मध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स उपलब्ध असतील. यामध्ये क्लिक करण्यायोग्य लिंक्स शेअर करता येतील. तसेच इमेज आणि व्हिडीओजही तुम्ही शेअर करू शकाल. यामध्ये इतर यूजर्सना लाईक आणि फॉलो करण्याची सुविधा असेल. मात्र युजर्स एखाद्या पोस्टवर कमेंट करू शकतील की नाही याबाबत काही माहिती समोर आलेली नाही. (हेही वाचा: WhatsApp's New Feature: नवीन कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह न करता वापरकर्त्याला कळणार समोरच्या व्यक्तीचे नाव)
दरम्यान, एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यापासून ट्विटर आपले युजर्स टिकवून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत नवीन मेटा अॅप ट्विटरच्या अडचणी आणखी वाढवू शकते. हे अॅप ट्विटरला थेट टक्कर देईल. या अॅपचा मेटालाही बराच लाभ होणार आहे. भारतात TikTok वर बंदी घातल्यानंतर, इन्स्टाग्रामने रील्स (Reels) फीचर लाँच केले होते, जे खूप लोकप्रिय झाले आहे.