Most hacked passwords (Photo Credits: Pixabay)

तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती झाली, हाताच्या बोटावर दुनिया नाचू लागली. सोशल मिडीया, बँकेचे व्यवहार, बुकिंग, शॉपिंग अशा अनेक गोष्टी काही क्लिक्सद्वारे होऊ लागल्या. मात्र दुसरीकडे हॅकिंगचा धोका वाढला. बँकेची खाती हॅक, किंवा विविध वेबसाईट हॅक करून महत्वाची माहिती चोराने अथवा कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याची अनेक उदाहरणे आपण पाहत आलो आहोत. याबाबत सध्या मिळालेल्या माहितीनुसार 2018 मध्ये भारतातील तब्बल 120 कोटी खाली हॅक करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतात प्रत्येक सेकंदाला 30 हॅकिंगचे प्रकार घडतात.

भारतात हॅकिंगचे प्रमाण इतके वाढले आहे की, याबाबतील अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. चोरलेले युजरनेम आणि पासवर्ड यांच्याद्वारे ही खाती हॅक करण्यात आली आहेत. क्लाउड डिलीव्हरी नेटवर्क प्रदाता अकामाई टेक्नोलॉजीज (Akamai Technologies) ने प्रसिद्ध केलेल्या  ‘State of the internet/security’च्या नवीन संस्करणात ही माहिती देण्यात आली आहे. हॅकिंगच्या बाबतीत अमेरिका, भारतनंतर कॅनडा तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या विविध खात्यांसाठी लोक साधारण एकाच पासवर्ड ठेवतात यामुळे हॅकर्सना ही झाती हॅक करणे अजून सोपे जाते. (हेही वाचा: कोल्हापूर येथील HDFC बँकेचे सर्वर हॅक करून, 34 व्यवहारांमधून 68 लाखांची चोरी)

मिडीया, मनोरंजन, गेमिंग अशा क्षेत्रात सर्वात जास्त हॅकिंगचे प्रकार घडल्याचे आढळून आले आहे. या क्षेत्रातील विविध गोष्टी हॅक करून त्या बाहेर विकल्या जात आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी तो लीक झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. दरम्यान, 2018 मध्ये अमेरिकेत 125 कोटी हॅकिंगचे प्रकार घडले आहेत, भारतात 120 कोटी तर कॅनडामध्ये 102 कोटी.