बँकेत होणारे ऑनलाईन घोटाळे (Online Fraud) यात आता काही नवल राहिले नाही. देशातील अनेक मोठमोठ्या बँकांवर ऑनलाईन दरोडा टाकून कोट्यावधी रुपयांची चोरी झाली आहे. मात्र आता कोल्हापूर (Kolhapur) सारख्या ठिकाणीही सर्वर हॅक करून बॅंकेला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. कोल्हापूर येथील दि. कोल्हापूर अर्बन बँकत, 19 एप्रिल, शुक्रवारी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव खरोशी यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. कोल्हापूर अर्बन को-ऑप बॅंकेचे शाहूपुरी एचडीएफसी (HDFC) बँकेत खाते आहे. 19 एप्रिल रोजी गुड फ्रायडेनिमित्त बँकेला सुट्टी होती. या दिवशी दि. कोल्हापूर अर्बन को-ऑप बॅंकेच्या दोन खात्यातून तब्बल 67 लाख 88 हजार 41 रुपये परस्पर काढून घेतले गेले. ही रक्कम ऑनलाईन वर्ग झाल्याचे लक्षात आल्यानंतर याची माहिती मुख्य अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर त्वरित याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. (हेही वाचा: व्यावसायिकाला गंडा; फक्त Missed Calls देऊन लुटले तब्बल 1.86 कोटी)
पैसे ट्रान्सफर करण्याची आयएमपीएस पद्धत हॅक करून हे पैसे चोरण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. 19 एप्रिलला सकाळी 11.08 ते दुपारी 2.28 या दरम्यान, एकूण 34 व्यवहार करून अर्बन बॅंकेच्या दोन वेगवेगळ्या खात्यातून ही रक्कम काढून घेण्यात आली आहे. दरम्यान, वर्षातील सर्वात मोठा सायबर हल्ला कॉसमॉस बँकेच्या सर्व्हर करण्यात आला होता़. हकर्सनी एकाच वेळी 29 देशातून अडीच हजार क्लोन व्हिसा आणि रुपे कार्डचा वापर करुन तब्बल 94 कोटी रुपयांची चोरी केली होती. तसेच जानेवारीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार फक्त पुण्यात एका वर्षात तब्बल साडेपाच हजार लोकांना ऑनलाईन चोरांनी गंडा घालून, कोट्यावधी रुपये लंपास केले आहेत.