Earth Hour Day: आज रात्री साजरा होणार 'अर्थ अवर डे'; 8.30 ते 9.30 वीज बंद ठेवण्याचे आवाहन, जाणून घ्या नक्क्की काय आहे ही चळवळ
Happy Earth Hour (Photo Credits: Pixabay)

दर वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रात्री साडेआठ वाजता जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी लाईट्स बंद ठेवतात. पृथ्वीच्या उन्नतीसाठी सुरु करण्यात आलेली ही चळवळ आहे. हा दिवस जगभर ‘अर्थ अवर’ (Earth Hour Day) म्हणून ओळखला जातो. यंदा, अर्थ अवर 27 मार्च रोजी होणार आहे. यानिमित्ताने जगातील 180 हून अधिक देशांतील लोक रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत त्यांच्या घरातील दिवे बंद ठेवतील. याद्वारे उर्जेची बचत करून पृथ्वी वाचवण्यासाठी एकत्र येण्याचा संदेश दिला जाईल.

वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (World Wide Fund for Nature, WWF) या वन्यजीव आणि पर्यावरण संघटनेने 2007 मध्ये अर्थ अवर डेची सुरुवात केली होती. 31 मार्च 2007 रोजी प्रथम ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे अर्थ अवर दिन साजरा करण्यात आला. यामध्ये लोकांना 60 मिनिटांसाठी सर्व दिवे बंद ठेवण्याची विनंती केली गेली व हळूहळू हा दिवस जगभरात साजरा होऊ लागला. अर्थ अवर डे ही वर्ल्ड वाइड फंडची एक मोहीम आहे, ज्याचा उद्देश लोकांना ऊर्जा बचत आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूक करणे आहे. वर्ल्ड वाइड फंडचा हेतू निसर्गास होणारी हानी रोखणे आणि मनुष्याचे भविष्य सुधारणे हा आहे.

2009 मध्ये भारत या मोहिमेचा एक भाग झाला. आज अर्थ अवर एक मोठी चळवळ बनली आहे. पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डब्ल्यूडब्ल्यूएफच्या या जागतिक मोहिमेची मदत हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगच्या समस्यांशी लढण्यास मदत करेल. म्हणून पर्यावरणाशी निगडीत अनेक संस्था, वीज कंपन्या यादिवशी लोकांना त्यांच्या घरातील तसेच कार्यालयातील लाईट्स बंद ठेवण्याचे आवाहन करतात. (हेही वाचा: Adani Electricity चे शनिवारी रात्री 8.30 ते 9.30 दरम्यान वीज पुरवठा बंद ठेवून Earth Hour मध्ये सामील होण्याचे आवाहन)

दरम्यान, अर्थ अवर दिवशी जगभरातील बर्‍याच ऐतिहासिक इमारतींचे दिवे बंद ठेवले जातात. यामध्ये न्यूयॉर्कमधील एम्पायर वर्ल्ड बिल्डिंग, दुबईतील बुर्ज खलिफा, पॅरिसमधील आयफेल टॉवर आणि अथेन्समधील अ‍ॅक्रोपोलि अशा 24 जगप्रसिद्ध ठिकाणांचा समावेश आहे. भारतामध्येही या दिवशी राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटसह अनेक ऐतिहासिक इमारतींमध्ये दिवे बंद करण्यात आले आहेत.