Logos of Flipkart and Amazon (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाच्या काळात देशाची आर्थिक स्थिती अजूनच डबघाईला आली. या दरम्यान लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे संसार रस्त्यावर आले. मात्र आता नुकत्याच झालेल्या फेस्टिव सेलमध्ये (Festive Sale) भारतीय जनतेने फार मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कोरोना साथीच्या काळात किरकोळ विक्रेत्यांना यंदाची दिवाळी आनंदाने साजरी करण्याची आशा होती व ती आता पूर्ण होताना दिसत आहे. 7 दिवसांच्या कालावधीत स्मार्टफोनच्या श्रेणीने एकूण विक्रीच्या 47 टक्के विक्रीवर आपला कब्जा केला आहे. या सेलच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दर मिनिटाला तब्बल दीड कोटी रुपयांचे स्मार्टफोन विकले गेले आहेत.

ई-कॉमर्स कंपन्यांनी 15 ते 21 ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या फेस्टिव सेलच्या विक्रीच्या पहिल्या आठवड्यात 4.1 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 29,000 कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्री केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 55 टक्के जास्त आहे. बाजार आकडेवारी गोळा करणारी कंपनी रेडसीर यांनी मंगळवारी एका अहवालात ही माहिती दिली. गेल्या वर्षी कंपन्यांनी त्यांच्या सणाच्या विक्रीदरम्यान पहिल्या आठवड्यात 2.7 अब्ज डॉलर्सची विक्री केली होती. स्मार्टफोनचे अधिकाधिक नवीन मॉडेल्स स्वस्त किंमतीमध्ये उपलब्ध झाल्याने या सेलमध्ये ‘स्मार्टफोन’ श्रेणीचा दबदबा राहिला.

यावेळी सेलमध्ये फॅशन प्रकाराचे योगदान फारसे नव्हते, त्याची विक्री 14 टक्के होती. बेंगळुरूस्थित कंपनी रेडसीरच्या अहवालानुसार घर आणि गृहसजावटीच्या श्रेणींमध्ये चांगली विक्री झाली. या सेलमध्ये फ्लिपकार्ट आणि Amazon यांचा एकूण 90 टक्के हिस्सा होता. यामध्ये वॉलमार्ट ग्रुपच्या फ्लिपकार्टने बाजी मारली. या दोघांच्या एकूण विक्रीपैकी 68 विक्री फ्लिपकार्टची झाली.

अहवालानुसार, यंदाच्या विक्रीदरम्यान खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या 5.2 दशलक्षांवर पोहोचली आहे, जी मागील वर्षाच्या 28 दशलक्षांच्या तुलनेत 85 टक्क्यांनी वाढली आहे. त्यापैकी आसनसोल, लुधियाना, धनबाद, राजकोट अशा इतर शहरांमधून सुमारे 55 टक्के ग्राहक आले होते.