Cognizant Layoffs 2023: आयटी दिग्गज कॉग्निझंट कंपनीची टाळेबंदी 3500 कर्मचाऱ्यांना करणार बेकार
Layoffs (PC- Pixabay)

माहिती तंत्रज्ञान  (IT) क्षेत्रातील दिग्गज कंपनी कॉग्निझंट (Cognizant) कंपनीने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2023 मध्ये त्यांच्या उत्पन्नात घट होईल. परिणामी कंपनीला 3,500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढावे (Cognizant Layoffs 2023) लागेल. कंपनीच्या नुकत्याच पुढे आलेल्या कमाई कॉलदरम्यान ही माहिती पुढे आली. कंपनीने म्हटले आहे की, आम्हाला बहुतांश महसूल यूएसमधून प्राप्त होतो. सध्या आयटी क्षेत्र काहीशा वाईट स्थितीतून जात आहे. त्यामुळे त्याचा परिणाम कंपनीच्या उत्पन्नावर होण्याची संभाव्य शक्यता विचारात घेऊन कंपनी कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबेल. इतकेच नव्हे तर आमच्या कार्यालयांमधील लाको चौरस फूट जागाही कंपनी कमी करेल असे व्यवस्थापनाने म्हटले आहे.

कंपनीच्या सीईओनी स्पष्ट केले की, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि कामगारांच्या कमतरतेसह, कोविड-19 साथीच्या आजाराच्या सततच्या परिणामांमुळे महसुलात घट झाली आहे. घसरणीचे परिणाम कमी करण्यासाठी, कॉग्निझंटने एक कॉस्ट ऑप्टिमायझेशन प्रोग्राम सुरू केला आहे ज्यामध्ये त्याचे कर्मचारी कमी करण्याचे धोरण समाविष्ट आहे. सीईओंनी पुढे सांगितले की, भविष्यातील बदलत्या परिस्थितीचा कानोसा घेऊन काही महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यामध्ये ऍक्सेंचर, टीसीएस आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करणार्‍या नॅस्डॅक-सूचीबद्ध IT मेजरचे पुनरुज्जीवन करण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे. उल्लेखनीय असे की, कंपनी यूएस मध्ये सूचीबद्ध आहे. मात्र, तिचे बहुतांश काम हे भारतातूनच चालते.

दरम्यान, कॉग्निझंटच्या सीईओने यावर भर दिला की कंपनी आपल्या कर्मचार्‍यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि व्यवसायाच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये प्रतिभांना नियुक्त करणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे सुरू ठेवेल. त्यांनी असेही सांगितले की कंपनी आपल्या डिजिटल परिवर्तन धोरणावर लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवेल, जी अलिकडच्या वर्षांत तिच्या वाढीचा प्रमुख चालक आहे. कॉग्निझंटमधील टाळेबंदी ही Accenture चे अनुकरण करते, ज्यांनी 19,000 लोकांना कामावरुन काढून टाकण्याचे घोषीत केले होते.