China Chang'e 4 Mission : आता चक्क चंद्रावर होणार कापूस आणि बटाट्याची शेती; चीनी संशोधकांच्या प्रयत्नांना यश
चंद्रावर उगवलेले कापसाचे झाड (संग्रहित-संपादित प्रतिमा)

अंतराळविश्वात चीन (China)ची कामगिरी सध्या वाखाणण्याजोगी आहे. चंद्रा (Moon)चा एकच भाग पृथ्वीवरुन दिसतो, आणि याच भागाची माहिती प्राप्त करण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले. मात्र याच्याही पुढेही जाऊन, चंद्राचा जो भाग दिसत नाही, अशा डार्क साईडवर चंद्राने आपेल चांग ई-4 (Chang'e-4) हे यान पाठवले आहे. 3 जानेवारीला सकाळी चीनचे हे यान यशस्वीरीत्या चंद्रावर उतरले. चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी या यानासोबत अनेक बिया आणि मातीचा एक बॉक्स पाठवण्यात आला आहे, यामध्ये कापूस, बटाटे, रेपसीड (पांढरे तीळ), रॉक क्रेस (फुलांची एक प्रजाती), यीस्ट आणि काही उडणाऱ्या माशांचा समावेश आहे, सोबत काही पोषकेही पाठवलेली आहेत. आता मिळालेल्या माहितीनुसार चंद्रावर चक्क कापसाचे आणि बटाट्याचे झाडे उगवले आहे, आणि ते वेगाने वाढतही आहे. या झाडाचे काही फोटो उपग्रहाद्वारे पृथ्वीवर पाठवण्यात आले आहेत. यामध्ये कापसाच्या झाडाला कोंबही फुटलेले दिसत आहे.

चांग ई-4 हे यान आपल्यासोबत एक रोव्हर घेऊन गेले आहे. हे रोव्हर लो फ्रिक्वेंसी रेडिओ एस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्वेशनच्या मदतीने चंद्राच्या या न दिसणाऱ्या भागातील पृष्टभागाची रचना आणि त्यात असलेल्या खनिजांची माहिती घेणार आहे. याचसोबत चंद्राच्या या भागात जीवांची निर्मिती करण्यास पोषक वातावरण आहे का नाही, याचेही संशोधन होणार आहे. याबाबत समाधानकारक बाब म्हणजे चंद्रावर चक्क कापसाचे झाड वाढत आहे. याचसोबत बटाट्याचे झाडही त्याच्या वेगाने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे यान या बियांसोबत ‘कंट्रोल्ड एन्व्हायर्नमेंट’ घेऊन गेले आहे. म्हणजे एखादे झाड वाढण्यास आवश्यक असलेल्या बाबी आपोआप या यानाकडून पुरवल्या जातील. यामध्ये साधारण 25 डिग्री तापमान या झाडांना पुरवले जात आहे. चंद्रावर असलेल्या अनियमित वातावरणात हे झाड यानाकडून नियंत्रित केलेल्या वातावरणात वाढत आहे. म्हणजेच अंतराळात जाणाऱ्या लोकांसाठी अन्नाचा पुरवठा अशा नियंत्रित केलेल्या वातावरणातील अन्नघटकांपासून होऊ शकतो, त्यासाठी पृथ्वीवरून पदार्थ पाठवण्याची गरज नाही हे लक्षात आले आहे.

आश्चर्य म्हणजे जर का आपण चंद्रावर नियंत्रित वातावरण तयार केले तर कदाचित मनुष्यप्राणीही तिथे जिवंत राहू शकतो, हे या उदाहरणावरून समजते. मात्र चंद्रावत दीर्घ काळापर्यंत मानव राहू शकत नाही, त्याऐवजी चंद्रापासून मंगळ (Mars) जवळ आहे, त्यामुळे मंगळावर जाण्यासाठी चंद्रावर काही काळ थांबून जाता येईल का याचाही शोध घेण्यात येणार आहे.

या प्रयोगाचे मुख्य, प्रध्यापक लियू हनलॉन्ग (Liu Hanlong) सांगतात, ‘आम्ही कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या परिसरात कशा प्रकारे जीवांची निर्मिती होऊ शकते याचा अभ्यास करीत आहोत. यामध्ये कापूस आणि बटाटा यांनी अपेक्षित प्रतिसाद दिला आहे. ज्याचा फायदा भविष्यात चंद्रावर मानव पाठवताना होऊ शकतो.’

याआधी चीनचे चांग ई-3 हे यान 2013 साली चंद्रावर उतरले होते. सोव्हिएट युनियनच्या 1976 साली चंद्रावर उतरलेल्या लुना 24 या यानानंतर चंद्रावर गेलेले हे पहिलेच यान होते. आता पुढच्या वर्षी चीनचे चांग ई-5 हे यान चंद्रावरील काही घटक पृथ्वीवर घेऊन येण्याचे काम करणार आहे, यामध्ये खनिजे, माती यांचा समावेश आहे.