वेदांता-फॉक्सकॉननंतर महाराष्ट्राला अजून एक धक्का; PhonePe ने घेतला राज्यातून बाहेर पडण्याचा निर्णय, जाणून घ्या कुठे असेल नवे कार्यालय
PhonePe (Photo Credits-Twitter)

वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर काही दिवसांनी, फिनटेक अॅप फोनपे (PhonePe) ने देखील महाराष्ट्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. एका वृत्तपत्रातील जाहीर सूचनेमध्ये, मुंबईतील PhonePe कार्यालय कर्नाटकात स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. फोनपेने आपले मुंबई कार्यालय बेंगळुरूला हलवल्याने सत्ताधारी सेना-भाजप सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. फोन पे हे एक युपीआय (UPI) आधारित अॅप आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही मोबाइल रिचार्ज, मोबाइल बिल, गॅस बिल, वीज बिल, डिश रिचार्ज, मनी ट्रान्सफर, ऑनलाइन शॉपिंग, फास्टटॅग खरेदी करणे इत्यादी गोष्टी करू शकता.

माहितीनुसार, फोनपेचे मुंबईतील अंधेरीत मुख्य कार्यालय आहे. हे कार्यालय कर्नाटकात हलवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्याता आला आहे. केंद्राने मंजुरी दिल्यानंतर फोनपेचे कार्यालय मुंबईतून कर्नाटकात हलवले जाईल. काही दिवसांपूर्वी 2.06 लाख कोटी रुपयांचा मेगा-प्रोजेक्ट गुजरातमध्ये राबविण्याच्या वेदांता-फॉक्सकॉनच्या घोषणेने महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली होती. त्यात आता फोनपेच्या निर्णयामुळे अजून भर पडू शकते.

वेदांतात-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या 90 टक्के करारामध्ये तब्बल 2 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता होती, जी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने अंतिम केली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर, वेदांता समूहाने जुलैमध्ये त्यांच्याशी अनेक बैठका घेतल्या, परंतु अखेरीस महाराष्ट्राला धक्का देत कंपनीने गुजरातची निवड करण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा: Vedanta Foxconn Deal फिसकटल्यावरून पुण्यात Aaditya Thackeray यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेचे 24 सप्टेंबरला जनआक्रोश आंदोलन)

लवकरच बहुराष्ट्रीय खाण कंपनी वेदांता लिमिटेड त्यांचा $20 अब्ज (रु. 1.54 लाख कोटी) सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरु करणार आहे. हा तैवानच्या फॉक्सकॉनसह संयुक्त उपक्रम आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या या फर्मचे गोवा, कर्नाटक, राजस्थान आणि ओडिशा येथे लोहखनिज, सोने आणि अॅल्युमिनियम खाणकामाचे मुख्य कार्य आहे. वेदांता लिमिटेड ही एक विपुल वैविध्यपूर्ण भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे, जिची वीज निर्मिती, खाणकाम, तेल आणि वायू क्षेत्रात प्रमुख उपस्थिती आहे. कंपनीची कमाई $20 बिलियनपेक्षा जास्त आहे.