गेले इतके दिवस वाद चालू असलेल्या ‘महिला क्रिकेट प्रशिक्षक’ मुद्द्यावर आता पडदा पडला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघा (Women’s Cricket Team)च्या प्रशिक्षकपदी डब्ल्यू. व्ही. रमण (WV Raman) यांची वर्णी लागली आहे. महिला क्रिकेट मधील अव्वल दर्जाची खेळाडू मिताली राजसोबत उडालेल्या खटक्यांमुळे पूर्व प्रशिक्षक रमेश पोवार प्रकाशझोतात आले होते. त्यांनीही नव्याने या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता, मात्र निवड समितीने रमण यांची निवड केली.
कपिलदेव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी या निवडसमितीने गुरुवारी अर्जदारांच्या मुलाखती घेतल्या. यात दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) व भारताचे डब्ल्यू. व्ही. रमण यांच्यामध्ये तगडी स्पर्धा होती. मात्र गॅरी कर्स्टन यांचा आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत आधीच करार झाला आहे. ते त्यांची जबाबदारी सोडून देण्यास तयार नव्हते, म्हणून या प्रशिक्षकपदाची माळ रमण यांच्या गळ्यात पडली.
दरम्यान रमन यांच्या निवडीवर बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी आणि सीओए सदस्य डायना एडुलजींनी नाराजी दर्शवत विरोध केला आहे. प्रशिक्षक निवडीचा हा निर्णय सीओएचा नाही. जर कोणताही निर्णय प्रशासनाला आणि अधिकारांना हानी पोहोचवत असेल तर याला बीसीसीआय (BCCI) चा निर्णय मानले जावू शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. यावर 17 जानेवारीला न्यायालयीन सुनावणी होणार आहे.
डब्ल्यू. व्ही. रमण यांनी भारताकडून 11 कसोटी व 27 वन डे सामने खेळले आहेत. 1992-93 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान त्यांनी शतक झळकवले होते. तसेच त्यांनी भारताचे 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे.