'रँकिंग्स मध्ये टॉपला असणाऱ्या टीमला खेळपट्ट्यांचा फरक पडू नये',भरत अरुण ह्यांचे मत
BHARAT ARUN | (PICTURE CREDIT: INSTAGRAM)

'रँकिंग्स (Rankings) मध्ये अग्रस्थानी असलेल्या संघाला मायदेशात त्यांच्या इच्छेनुसार खेळपट्ट्या मागून घेण्याची आवश्यकता नाही, उलट समोर आलेल्या परिस्थितीनुसार खेळ बदलता आला पाहिजे,' असे विधान भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक (India's Bowling Coach) भरत अरुण ह्यांनी केले. ते आफ्रिकेविरुद्ध होत सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या पार्श्वभूमीवर बोलत होते.

'आम्ही खेळपट्ट्या आम्हाला हव्या तशा बनवून घेत नाही. अग्रस्थानी असण्यासाठी तुमच्या वाट्याला येणाऱ्या सर्व आव्हानांना तुम्हाला तोंड देता आले पाहिजे. आम्ही जेव्हा परदेशात जाऊन खेळतो, तेव्हा आम्ही परिस्थितीचा बाऊ करत नाही. आम्ही खेळपट्टी अगदी शेवटच्या क्षणी बघतो,' असेही ते पुढे म्हणाले.

'जेव्हा आम्हाला स्विंगला अनुकूल खेळपट्ट्या मिळतात, तेव्हा भारतीयांनी स्विंग खेळणं शिकून घ्यायला पाहिजे, असा आम्हाला ऐकवले जाते. स्विंग होणाऱ्या खेळपट्ट्या ह्या चांगल्या मानल्या जातात, पण तेच चेंडू जर पहिल्या दिवसापासून स्पिन होत असेल तर खेळपट्टी वाईट मानली जाते, असे का?', असे म्हणत त्यांनी पूर्व परदेशी खेळाडूंवर ताशेरे ओढले.

उद्यापासून पुणे येथे आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना रंगत आहे. 2 वर्षांपूर्वी पुण्यात (Pune) ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात फिरकी गोलंदाजां समोर भारताने नांगी टाकली होती.