भारतीय महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल (Photo Credit: Facebook)

भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचा पुरस्कार म्हणून ओळख असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी (Khel Ratna Award) सर्व क्रीडा संघटना आपापल्या खेळाडूंच्या नावाची शिफारस करत आहे. खेल रत्न पुरस्कारासाठी हॉकी इंडियाने (Hockey India) भारतीय महिला संघाच्या कर्णधार राणी रामपाल (Rani Rampal), तर वंदना कटारिया, मोनिका आणि हरमनप्रीत सिंह (Harmanpreet Singh) यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. मेजर ध्यानचंद लाइफटाइम अचीवमेंट या पुरस्कारासाठी भारताचे माजी खेळाडू आरपी सिंह आणि तुषार खांडेकर यांची नावं पाठवण्यात आली आहेत. तसेच प्रशिक्षक बी.जे.करियप्पा आणि रोमेश पठानिया यांची नाव हॉकी इंडियाने द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पाठवलं आहे. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल. (Khel Ratna Award 2020: रोहित शर्माऐवजी केवळ 3 क्रिकेटपटूंनाच मिळाला क्रीडा क्षेत्रातला मानाचा सन्मान, वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचाही आहे समावेश)

मागील काही वर्षात राणीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये दिलासादायक कामगिरी केली आहे. भारतीय महिलांनी काही महिन्यांपूर्वी ऑलिम्पिक पात्रता फेरीत अमेरिकेवर निर्णायक सामन्यात मात करून खेळाच्या सर्वोच्च स्पर्धचे तिकीट मिळवलं होतं. तिच्या याच कामगिरीमुळे हॉकी इंडियाने राणी रामपालचं नाव सुचवल्याचं म्हटलं जात आहे. राणीच्या नेतृत्वात भारताने 2017 मध्ये महिला आशिया चषक जिंकला आणि 2018 मध्ये आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.

दुसरीकडे, वर्ल्ड स्पोर्ट्स अ‍ॅथलीट अवॉर्ड मिळवणार्‍या पहिल्या भारतीय राणीला 2016 मध्ये अर्जुन आणि 2020 मध्ये पद्मश्री मिळाला आहे. भारतासाठी 200 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्‍या वंदना आणि 150 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग खेळलेल्या मोनिकाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. दोघी हीरोशिमा येथील एफआयएच मालिका फायनल, टोकियो ऑलिम्पिक टेस्ट टूर्नामेंट आणि भुवनेश्वरमधील ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताचे विजयाचे मुख्य सूत्रधार होत्या. अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय पुरुष संघाचे ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंह यांचे नावही पाठविण्यात आले आहे. त्यांनी भुवनेश्वरमधील एफआयएच मालिका फायनलमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली होती. माजी खेळाडू आरपी सिंह आणि खांडकर यांच्या हॉकीच्या योगदानाबद्दल त्यांचे नाव मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी पाठविण्यात आले आहे.