युवराज सिंह याने 'त्या' विधानाबद्दल मागितली माफी, युजवेंद्र चहलबद्दल आक्षेपार्ह विधानाबद्दल पोलिसांत केली होती तक्रार
युजवेंद्र चहल आणि युवराज सिंह (Photo Credit: Instgaram)

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh) याने ट्विटरच्या माध्यमातून जातीवादी शब्द वापरल्याबद्दल माफी मागितली आहे. युवीने ट्विटरवर लिहिले की, कोणत्याही प्रकारच्या भेदभावावर त्याचा विश्वास नाही आणि त्यांचे शब्द चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले. युवराज असेही म्हणाला की, जर त्याच्या विधानामुळे कोणाला दुखावले तर त्याबद्दल तो दिलगिरी व्यक्त करतो. काही दिवसांपूर्वी युवराजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात तो रोहित शर्मासोबतच्या लाइव्ह इन्स्टाग्राम चॅट दरम्यान जातीवाचक शब्द वापरताना दिसला होता. रोहितसोबत चॅटमध्ये युवीने युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) 'भंगी' असे संबोधले होते आणि त्या विधानानंतर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. इतकेच नाही तर, दलित हक्कांसाठी लढणाऱ्या एका कार्यकर्त्याने युवीविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर आत युवीने आपली बाजू मांडली. (युवराज सिंह विरोधात पोलिसात गुन्हा दाखल, इंस्टाग्राम लाइव्ह दरम्यान युजवेंद्र चहल विरोधात वापरला होता जातीवाचक शब्द)

युवराजने ट्विटरवर एक निवेदन जारी करत लिहिले की, "मला हे स्पष्ट करून सांगायचे आहे की रंग, जात, पंथ किंवा लिंगाच्या आधारे कोणत्याही भेदभावावर माझा विश्वास नाही. मी माझे जीवन लोकांच्या हितासाठी जगले आहे आणि भविष्यातही तेच करायचे आहे. मी प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो. मी माझ्या मित्रांशी बोलत होतो आणि त्यावेळी माझा मुद्दा चुकीच्या अर्थाने घेतला गेला, जे अयोग्य होते. एक जबाबदार भारतीय म्हणून मला सांगायचे आहे की माझ्या बोलण्याने मी नकळत एखाद्याला दुखवले तर मी खेद व्यक्त करतो. माझे देशाबद्दल आणि देशातील लोकांबद्दल माझे प्रेम कायम आहे."

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार हरियाणाच्या (Haryana) हिसारमधील हंसी या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. युवराजने रोहितशी संवादा वापरलेले शब्द काही सोशल मीडिया चाहत्यांनी निदर्शनास आणल्यानंतर ही घटना उघडकीस आली. युवराजच्या या शब्दाचा अयोग्य वापर झाल्यावर अनेक यूजर्सनी युवीवर टीका केली. युवराजने चहलची खिल्ली उडवताना वर्णद्वेषी शब्द वापरला. या संभाषणात युवराज आणि रोहित चहलच्या टिकटॉक व्हिडिओची खिल्ली उडवत होते.