युवराज सिंह विरोधात पोलिसात गुन्हा दाखल, इंस्टाग्राम लाइव्ह दरम्यान युजवेंद्र चहल विरोधात वापरला होता जातीवाचक शब्द
युवराज सिंह (Photo Credits: Getty Images)

माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh) आपल्या एका टीकेमुळे मोठ्या संकटात सापडला आहे. रोहित शर्मा आणि त्याच्यात झालेल्या मैत्रीपूर्ण लाइव्ह सत्रादरम्यान घडलेल्या घटनेसाठी त्याला काही गंभीर आरोपांचा सामना करावा लागू शकतो. लाइव्ह सत्रा दरम्यान युवीने युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना ‘भंगी’ (Bhangi) म्हटले. माजी खेळाडूने केलेली टिप्पणी हरियाणामधील काही दलित हक्क कार्यकर्त्यांना (Dalit Rights Activist) पटली नाही आणि आता त्यांनी युवी विरोधात पोलिसात धाव घेतली आहे. दलित हक्क कार्यकर्ते आणि वकील रजत कालसन यांनी युवराजविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार हरियाणाच्या (Haryana) हिसारमधील हंसी या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. युवराजने रोहितशी संवादा वापरलेले शब्द काही सोशल मीडिया चाहत्यांनी निदर्शनास आणल्यानंतर ही घटना उघडकीस आली. युवराजच्या या शब्दाचा अयोग्य वापर झाल्यावर अनेक यूजर्सनी युवीवर टीका केली. (युवराज सिंहने लाईव्ह चॅटमध्ये वापरला जातीवाचक शब्द, व्हायरल व्हिडिओवर यूजर्सकडून माफीची मागणी)

यूजर्सनी घटनांकडे लक्ष देणे सुरू केल्यानंतर अनेकांनी युवराजकडे सार्वजनिक व्यासपीठावर हा शब्द वापरल्याबद्दल माफीची मागणी केली. रजत कलसन यांनी जो मुख्य अजेंडा मांडला तो म्हणजे युवराजने दलितविरोधी केलेली टीका. कळसनने तक्रार दाखल केल्यावर रोहितवरही निशाणा साधला. युवराजच्या या गोष्टीस रोहितने विरोध दर्शवायला हवा होता, परंतु तो हसला आणि त्यावर सहमत असल्याचे दर्शवले. कळसनने सांगितले की त्यांनी तक्रार दाखल करून युवराजच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच सीडी आणि कागदपत्रेही पोलिसांच्या ताब्यात दिली जातील, असेही ते म्हणाले. या विषयावर बोलताना हांसी एसपी लोकेंद्र सिंह म्हणाले आहेत की त्यांनी तपास डीएसपीकडे सादर केला आहे. तसेच सर्व बाबींची चौकशी केली जाईल आणि चौकशी झाल्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दोषी आढळल्यास युवीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

रोहित बरोबर लाइव्ह चॅट दरम्यान एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, ज्याविषयी चर्चा होत आहे त्या गप्पा खूप जुन्या आहेत. काही दिवसांपूर्वी युवराज आणि रोहित यांच्यात लाइव्ह सेशन झाले होते. यावेळी युवराजने चहलची खिल्ली उडवताना वर्णद्वेषी शब्द वापरला. या संभाषणात युवराज आणि रोहित चहलच्या टिकटॉक व्हिडिओची खिल्ली उडवत होते.