VEL vs TBL, Women's T20 Challenge 2020: डिएंड्रा डॉटिनच्या नाबाद खेळीने ट्रेलब्लेझरची विजयी सुरुवात, मिताली राजच्या वेलॉसिटीवर 9 विकेटने केली मात
डिएंड्रा डॉटिन आणि रिचा घोष (Photo Credit: Twitter/IPL)

VEL vs TBL, Women's T20 Challenge 2020: महिला टी-20 चॅलेंजच्या (Women's T20 Challenge) आजच्या सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या मिताली राजच्या नेतृत्वातील वेलॉसिटी (Velocity) संघाने निराशाजनक कामगिरी केली आणि त्यांना 15.1 ओव्हरमध्ये 47 धावांपर्यंतच मजल मारता आली. अशा स्थितीत विजयासाठी ट्रेलब्लेझरसमोर (Trailblazers) फक्त 48 धावांचे लक्ष्य होते जे त्यांनी अवघ्या 7.4 ओव्हरमध्ये गाठले. स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील संघाच्या विजयात सलामी फलंदाज डिएंड्रा डॉटिनने (Deandra Dottin) मोठी भूमिका बजावली. डॉटिनने नाबाद 29 धावा केल्या. याशिवाय, रिचा घोषने (Richa Ghosh) नाबाद 13 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, फलंदाजीनंतर वेलॉसिटी संघ गोलंदाजीत देखील प्रभावी कामगिरी करू शकला नाही. ले कॅस्परेकने एकमेव विकेट घेतली. कॅस्परेकने ट्रेलब्लेझरची कर्णधार मंधानाला अवघ्या 6 धावांवर माघारी धाडलं. यासह महिला टी-20 चॅलेंजची ट्रेलब्लेझर संघाने विजयी सुरुवात केली आणि आता त्यांचा पुढील सामना हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हासशी होईल. (Women's T20 Challenge 2020: सोफी इक्लेस्टोन, झुलन गोस्वामी यांच्यासमोर वेलॉसिटी संघ ढेर, ट्रेलब्लेझरला विजयासाठी फक्त 48 धावांचे लक्ष्य)

आजच्या सामन्यात वेलॉसिटी कर्णधार मिताली राजने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला पण वेलॉसिटी फलंदाज सोफी एक्सेलस्टोन, झुलन गोस्वामी  यांच्या अनुभवी हल्ल्यासमोर टिकू शकले नाही आणि स्वस्तात माघारी परतले. वेलॉसिटीसाठी शेफाली वर्मा, शिखा पांडे आणि कॅस्परेक दुहेरी आकड्यात धावा करू शकले. शेफालीने 13 धावा केल्या, तर कॅस्परेक नाबाद 11 धावा करून परतली. शिखा पांडे 10 धावांवर धावबाद झाली. दरम्यान, आजच्या सामन्यात पराभव झाल्याने वेलॉसिटीने फायनलमध्ये स्थान मिळवण्याची संधी गमावली. महिला टी-20 चॅलेंजच्या त्यांच्या पहिल्या सामन्यात वेलॉसिटीने सुपरनोव्हासविरुद्ध मोठा विजय मिळविला होता, परंतु दुसर्‍या सामन्यात ते ढेर झाले.

दुसरीकडे, आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करताना वेलॉसिटीसाठी सर्वात मोठा डाव शेफाली वर्माने खेळला. तिने 9 चेंडूत 13 धावा केल्या. ले कॅस्परेक 11 धावांवर नाबाद आणि शिखा पांडेने 10 धावा केल्या. याशिवाय कोणताही फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकला नाही. दुसरीकडे, ट्रेलब्लेझरच्या वतीने, सोफी इक्लेस्टोनने 3.1 ओव्हरमध्ये 9 धावा देत 4 विकेट घेतल्या, तर झुलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दीप्ती शर्माला 1 विकेट मिळाली.