Women's T20 Challenge 2020: सोफी इक्लेस्टोन, झुलन गोस्वामी यांच्यासमोर वेलॉसिटी संघ ढेर, ट्रेलब्लेझरला विजयासाठी फक्त 48 धावांचे लक्ष्य
ट्रेलब्लेझर संघ (Photo Credit: Twitter/IPL)

Women's T20 Challenge 2020: ट्रेलब्लेझर (Trailblazers) आणि वेलॉसिटी (Velocity) यांच्यातील आजच्या महिला टी-20 चॅलेंजच्या (Women's T20 Challenge) सामन्यात मिताली राजच्या टीमने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण तो निर्णय तिच्या फलंदाजांनी चुकीचा सिद्ध केला. वेलॉसिटीचा एकही फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही आणि ट्रेलब्लेझरच्या सोफी एक्सेलस्टोन (Sophie Ecclestone), झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) आणि राजेश्वरी गायकवाडच्या अचूक हल्ल्यासमोर ढेर झाले आणि संघाला 15.1 ओव्हरमध्ये 47 धावांपर्यंतच मजल मारता आली. महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील कोणाही संघाचा हा सर्वात कमी स्कोर आहे. ट्रेलब्लेझरसाठी गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. ट्रेलब्लेझरसाठी सोफी एक्सेलस्टोनने सर्वाधिक 4 तर झुलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाड यांना प्रत्येकी 2 दीप्ती शर्माला 1 विकेट मिळाली. दुसरीकडे, पहिले फलंदाजी करणाऱ्या वेलॉसिटीसाठी शेफाली वर्मा (Shafali Verma), शिखा पांडे आणि ले कॅस्परेक यांनी दुहेरी आकड्यात धावा केल्या. शेफालीने 13 धावा केल्या, ले कॅस्परेक नाबाद 11 धावा करून परतली. (Women's T20 Challenge 2020: मिताली राजने जिंकला टॉस; वेलॉसिटीचा पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय, असा आहे Playing XI)

टॉस जिंकून पहिले फलंदाजी करताना वेलॉसिटीची सुरुवात खराब राहिली. भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या झुलन गोस्वामीने शेफाली वर्माला बोल्ड करून मिताली राजच्या संघाला पहिला धक्का दिला. यानंतर संघाच्या विकेट पाडण्याचे सत्र सुरूच राहिले. वेलॉसिटीसाठी मागील सामन्यात मॅच-विंनिंग कामगिरी करणारी वेद कृष्णमूर्ती यंदा भोपळाही फोडू शकली नाही. शेफाली वगळता शिखा पांडे 10 धावांवर धावबाद झाली.

आजच्या सामन्यात मिताली राजने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. वेलॉसिटीने आजचा सामना जिंकल्यास ते थेट फायनल गाठतील. आजच्या सामन्यापूर्वी वेलॉसिटीने पहिल्या सामन्यात सुपरनोव्हासचा 5 विकेटने पराभव केला होता. ट्रेलब्लेझरचा यंदाच्या स्पर्धेतील हा पहिला सामना आहे.