RR vs RCB, IPL 2024 Eliminator: इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RR vs RCB) हे एलिमिनेटर सामन्यात आज म्हणजेच 22 मे रोजी आमनेसामने येतील. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Cricket Stadium) संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. त्याचवेळी, सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी 7 वाजता नाणेफेक होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी ही स्पर्धा आतापर्यंतच्या चढ-उतारांपैकी एक आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकेल, तर पराभूत संघ स्पर्धेबाहेर जाईल. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एलिमिनेटर सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला गेला होता. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सवर 71 धावांनी विजय मिळवला होता.
दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 15 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सने 13 सामने जिंकले आहेत. दरम्यान, 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. गेल्या हंगामात दोन्ही संघ 2 सामन्यात आमनेसामने आले होते आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दोन्ही सामने जिंकले होते. दोन्ही संघांमधील सर्वोच्च धावसंख्या (217) आणि सर्वात कमी धावसंख्या (58) होती. हे दोन्ही स्कोअर राजस्थान रॉयल्सने केले आहेत. (हे देखील वाचा: RCB vs RR IPL 2024 Eliminator Live Streaming: एलिमिनेटरमध्ये राजस्थान-बेंगळुरू मध्ये होणार लढत, पराभूत संघाचा प्रवास संपणार; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह)
नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांची कामगिरी
आयपीएलच्या इतिहासात नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 15 सामने जिंकले असून दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी 18 सामने जिंकले आहेत. या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने एकूण 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी 3 जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने येथे 15 सामने खेळले आहेत, त्यापैकी 9 जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान आणि युझवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, कर्ण शर्मा आणि मोहम्मद सिराज.