अरे बाप रे! MS Dhoni झाला आहे राहुल द्रविडच्या रागाचा शिकार, वीरेंद्र सेहवागने सांगितला जुना किस्सा
राहुल द्रविड आणि एमएस धोनी (Photo Credit: PTI)

भारतीय संघाचा माजी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virender Sejhwag) नुकतंच माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) एक मनोरंजक किस्सा शेअर केला आहे. त्यात त्याने सांगितले आहे की एकेकाळी भारताचा महान खेळाडू आणि क्रिकेट मैदानावर शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड (Rahul Dravid) एमएस धोनीवर (MS Dhoni) खूप चिडला होता. भारतीय संघाला वेगवान सुरुवात देणारी म्हणून ओळखला जाणारा सेहवाग म्हणाला की, 2006 च्या पाकिस्तान दौर्‍या (India Tour of Pakistan) दरम्यान एमएस धोनीने चुकीचा फटका खेळला होता आणि त्यानंतर संतप्त द्रविडने त्याला फटकारले होते. गेल्या काही दिवसांपासून द्रविडने केलेली जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सेहवागने हा गौप्यस्फोट केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जाहिरातीत द्रविड आपल्या मैदानावरील स्वभावाविरुद्ध आक्रमक आणि रागिट दिसत आहे. (Rahul Dravid च्या जाहिरातीतील फोटो शेअर करत Mumbai Police नी सांगितले मास्क घालण्याचे महत्त्व)

Cricbuzz ला दिलेल्या मुलाखतीत सेहवागने म्हटले की, “त्यावेळी धोनी नव्याने संघात आला होता. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात बाद झाल्यानंतर जेव्हा द्रविडने त्याला फटकारले तेव्हा त्याच्या पुढच्याचा सामन्यात त्याने फलंदाजीत काही बदल केले. पुढच्या सामन्यात जेव्हा धोनी फलंदाजीला उतरला, तेव्हा मी पाहिले की तो जास्त शॉट्स खेळत नव्हता. मी त्याला विचारल्यावर त्याने म्हटले की त्याला पुन्हा द्रविडचा ओरडा खायचा नाही आहे.” त्या घटनेची आठवण करत सेहवाग म्हणाला की, धोनीला फटकारताना द्रविड बहुधा इंग्रजी शब्द वापरत असे. त्यातील निम्मेही मला समजू शकले नाहीत. त्याने धोनीला फटकारले आणि म्हणाले, “तू असाच खेळतो का? तुला सामना संपवायचा होता.”

विशेष म्हणजे त्या दौर्‍यावर कसोटी मालिका 1-0 ने गमावल्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले आणि वनडे मालिकेत 4-1ने विजय मिळवला. द्रविडने इंग्रजी शब्द वापरल्यामुळे त्याला आश्चर्य वाटले, असे देखील सेहवाग म्हणाला.