IND vs SA 2nd Test: टीम इंडिया केपटाऊनमध्ये करणार 2024 वर्षाची सुरुवात, 30 वर्षांपासून उघडले नाही विजयाचे खाते
IND vs SA (Photo Credit - Twitter)

IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून दारूण पराभवाला (SA Beat IND) सामोरे जावे लागले होते. आता भारतीय संघ या मालिकेत दक्षिण आफ्रिकेपेक्षा 0-1 ने मागे पडला आहे. दुसरा कसोटी सामना जिंकून संघाला भारताविरुद्धची मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवायची आहे. जे इतके सोपे वाटत नाही. कारण आहे टीम इंडियाचा केपटाऊनमधील खराब रेकॉर्ड. (हे देखील वाचा: Rohit Sharma Milestone: रोहित शर्माने केला अनोखा विक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यावर्षी लगावले सर्वाधिक षटकार; पाहा हिटमॅन'चे आश्चर्यकारक आकडे)

केपटाऊनमध्ये टीम इंडिया 30 वर्षांपासून जिंकू शकलेली नाही

दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या न्यूलँड स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानावर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना जिंकता आलेला नाही. टीम इंडिया गेली 30 वर्षे या मैदानावर कसोटी सामना जिंकण्याची वाट पाहत आहे. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा विक्रम सुधारायचा आहे. या मैदानावर टीम इंडियाने 1993 साली पहिला सामना खेळला होता. टीम इंडियाने आतापर्यंत केपटाऊनमध्ये एकूण 6 कसोटी सामने खेळले आहेत. दुसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाला मालिका गमावणे टाळायचे आहे.

1. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 1993 (ड्रॉ)

2. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 1997 (भारताचा पराभव)

3. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2007 (भारताचा पराभव)

4. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2011 (ड्रॉ)

5. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, वर्ष 2018 (भारताचा पराभव)

6. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, वर्ष 2022 (भारताचा पराभव)

टीम इंडियात होऊ शकतात बदल 

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एक किंवा दोन बदल दिसू शकतात. वृत्तानुसार, प्रसिध कृष्णाला दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळले जाऊ शकते तर त्याच्या जागी आवेश खानचा संघात समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा केपटाऊन कसोटीत पुनरागमन करू शकतो.