IND vs SA Series 2023: भारत - दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला रविवारपासुन होणार सुरुवात, येथे जाणून घ्या सामन्याची वेळ आणि पूर्ण वेळापत्रक
Team India (Photo Credit - Twitter)

भारतीय संघ रविवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला (T20 Series) सुरुवात करणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया मागील ऑस्ट्रेलिया मालिकेपेक्षा थोडी वेगळी दिसणार आहे.  मालिकेतील पहिला सामना रविवारी डर्बन येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) सोपवण्यात आली आहे. या मालिकेत पुन्हा एकदा युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. कारण भारतीय मैदानावर ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या टी-20 मालिकेत युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी करत मालिका आपल्या नावावर केली केली. पण त्यांची खरी परिक्षा दक्षिण आफ्रिकेच्या उसळत्या खेळपट्टीवर होणार आहे त्यामुळे सगळ्यांचे लक्ष सूर्यकुमारच्या युवा संघावर असेल. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या जाणाऱ्या मालिकेत टी-20ची कमान सूर्यकुमार यादवकडे आहे तर वनडे संघाची कमान अनुभवी केएल राहुलकडे असुन कसोटी संघाची कमान रोहित शर्माकडे असणार आहे.

टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-20 सामन्यांनंतर वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 साठी 3 वेगवेगळे कर्णधार असतील. त्याचबरोबर या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरला टी-20 सामन्याने होणार आहे. यानंतर 12 आणि 14 डिसेंबरला दुसरा आणि तिसरा टी-20 सामना खेळवला जाईल. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरू होईल. टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येणार आहेत.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना 17 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. जोहान्सबर्गच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. यानंतर मालिकेतील दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना 19 आणि 21 डिसेंबर रोजी खेळवला जाईल. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. मात्र त्यानंतर दुपारी साडेचार वाजल्यापासून दोन्ही सामने खेळवले जातील. (हे देखील वाचा: IND vs SA Series 2023: दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघात अद्याप 3 खेळाडू सामील झाले नाही, जाणून घ्या काय आहे कारण)

टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांनंतर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवली जाणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे. हा कसोटी मालिका सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता खेळवला जाईल. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतील सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येतील. याशिवाय, तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल.