भारतीय संघाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्र सिंह धोनीने शनिवार, 15 ऑगस्ट रोजी निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. धोनीच्या निवृत्तीनंतर त्याचा सहकारी आणि चिन्ना थाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाने (Suresh Raina) देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एक्सिट घेतली. रैनाने धोनीच्या नेतृत्वात कारकीर्दीतील बहुतेक सामने खेळला आणि मैदानावरील त्यांची मैत्रीही खूप घट्ट होती. आणि दोघांनी एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. रैना अजूनही 33 वर्षांचा आहे आणि त्याला टीम इंडियामध्ये (Team India) परत येण्याची संधी होती, पण त्यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहण्याचे ठरवले. 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रैना भारताकडून 16 कसोटी, 226 एकदिवसीय आणि 78 टी-20 सामने खेळला आहे. रैनानं आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या 16व्या वर्षी केली होती. 15 वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीत रैनाने बरेच असे डाव खेळले जे अत्यंत रोमांचकारी होते आणि त्याच काळात त्याने काही उत्तम विक्रमही नोंदवले ज्यामुळे तो नेहमीच लक्षात राहील. (Suresh Raina Retires: भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर)
वयाच्या 23व्या वर्षी सुरेश रैनाकडे टी-20 संघाची धुरा देण्यात आली आणि झिम्बाब्वेविरुद्ध 2010मध्ये झालेल्या मालिकेत रैना संघाचा कर्णधार झाला. रैना तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. हाँगकाँगविरुद्ध सामन्यात त्याने पहिले वनडे शतक तर श्रीलंकेविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले. 2010 टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपात दक्षिण आफ्रिकाविरूद्ध त्याने पहिले शतक झळकावले होते. टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो भारताचा पहिला खेळाडू होता. इतकेच नाही तर पदार्पण कसोटीत रैनाने शतक झळकावले होते. शिवाय, रैनाने आयपीएलमध्ये देखील एक शतक ठोकले आहेत. रैनाने आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात शानदार पद्धतीने केली, पण तो भारताकडून अधिक कसोटी सामने खेळू शकला नाही. टी-20 विश्वचषक आणि वनडे विश्वचषकात शतक झळकावणारा रैना हा भारताचा एकमेव फलंदाज आहे. रैनानंतर आजवर कोणत्याही भारतीय फलंदाजाने हे आश्चर्यकारक कामगिरी केलेले नाही.
धोनी आणि रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले असले तरी दोघे आयपीएल खेळत राहतील. रैनाचे आणि धोनी 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत खेळताना पाहतील. आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी दोघे खेळाडू जोरदार तयारी करत आहेत.