World Cup 2011 Final Fixing Claim: भारत-श्रीलंका वर्ल्ड कप फायनल फिक्सिंग प्रकरणात श्रीलंका पोलिसांचा मोठा निर्णय, 'या' कारणामुळे थांबवला तपास
एमएस धोनीने षटकार मारून भारतासाठी मिळवले होते जेतेपद (Photo Credit: Twitter)

श्रीलंकेच्या पोलिसांनी शुक्रवारी देशातील 2011 वर्ल्ड कपमधील अंतिम (World Cup Final) पराभव फिक्स असल्याच्या आरोपाचा तपास संपविला. कुमार संगकारा (Kumar Sangakkara) आणि महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांच्यासारख्या दिग्गजांची विधाने नोंदवल्यानंतर पुरावा मिळाला नाही, असं म्हणत PTI च्या अहवालानुसार पोलिसांनी तपस थांबवला. माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगामगे (Mahindananda Aluthgamage) यांनी भारताने जिंकलेली फायनल काही विशिष्ट पक्षांनी फिक्स केली होती असा आरोप केला होता. त्यामुळे पोलिसांच्या विशेष तपास विभागाने चौकशी केली. तपासा दरम्यान, माजी कर्णधार संगकारा, माजी मुख्य निवडक अरविंदा डी सिल्वा आणि इतर काही जणांविरुद्ध या आठवड्यात चौकशी करण्यात आली होती. “आम्ही क्रीडा मंत्रालयाच्या सेक्रेटरीला अहवाल पाठवणार आहोत, ज्याने आम्हाला मार्गदर्शन केले. आज झालेल्या अंतर्गत चर्चेनंतर आम्ही तपास संपविला आहे,” खेळाशी संबंधित गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष तपास युनिटचे प्रभारी पोलिस अधीक्षक जगथ फोन्सेका यांनी पत्रकारांना सांगितले. (World Cup 2011 Final Fixing Investigation: कुमार संगकाराची कसून चौकशी, संतप्त चाहत्यांचा क्रीडा मंत्रालय कार्यालयाबाहेर निषेध)

2011 वर्ल्डकपच्या काळात, अलुथगमगे हे श्रीलंकेचे क्रीडामंत्री होते आणि त्यांच्या वक्तव्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली. “2011 विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. मी क्रीडामंत्री असताना हा प्रकार घडला आहे. मी हे खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो आहे. पण देशासाठी मी यामध्ये कोणाचाही नाव घेणार नाही. भारताविरुद्ध अंतिम सामना आपण जिंकू शकलो असतो, पण तो फिक्स केला गेला होता. मी यात खेळाडूंना गुंतवू इच्छित नाही. पण काही लोकांनी हा सामना फिक्स करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली,”अलुथमगे यांनी विधान केले होते.

फोन्सेकाच्या म्हणण्यानुसार, अल्थगमगे यांनी केलेले 14-पॉईंट आरोपांची पुष्टी केली जाऊ शकत नाही. “आम्हाला खेळाडूंकडून आणखी चौकशी का केली जाण्याचे कोणतेही कारण दिसत नाही”, फोन्सेका पुढे म्हणाले. फोन्सेका म्हणाले की फायनलमध्ये अचानक संघातील बदलांची कारणे तीनही खेळाडूंनी स्पष्ट केली. माजी क्रीडामंत्र्यांनी अंतिम सामन्यात संघ निवडात चार बदलांविषयी शंका उपस्थित केली होती. “आम्हाला वाटले की सर्व खेळाडूंना निवेदन देण्यासाठी बोलवून घेण्याने अनावश्यक गोंधळ उडेल,” फोन्सेका म्हणाले की, अलुथमगेच्या विधानानंतरही आयसीसीने या प्रकरणाचा पाठपुरावा केला नव्हता.