संजू सॅमसन (Photo Credit: Facebook)

युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याने श्रीलंका (Sri Lanka) विरूद्ध पुणे टी-20 मध्ये पुनरागमन केले पण लवकरच त्याचा आनंद हरवला. तब्बल 5 वर्षांनंतर त्याला भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच चेंडूवर षटकार मारत त्याने आपल्या आगमनाची घोषणा केली. पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार मारताच डगआऊटमध्ये बसलेला कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने आनंदाने उडी मारली. त्याने टाळ्या वाजवून सॅमसनचा उत्साह वाढवला. तो त्याचा डाव लांबवू शकला नाही आणि वनिंदूं हसरंगाच्या (Wanindu Hasaranga) चेंडूवर बाद झाला. अशाप्रकारे फलंदाजी करताना सॅमसन केवळ 2 चेंडू क्रीजवर टिकू शकला. 2015 मध्ये सॅमसनने झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केले.मात्र, त्यानंतर पुन्हा संधी मिळाली नाही, परंतु गेल्या वर्षी घरगुती क्रिकेटमधील जबरदस्त कामगिरीमुळे त्याने पुनरागमन करण्याची चिन्हे दाखवली. (IND vs SL 3rd T20I: भारतीय गोलंदाजांनी केला कहर; टीम इंडियाने श्रीलंकाविरुद्ध 78 धावांनी विजय मिळवत केला 2-0 क्लीन-स्वीप)

शुक्रवारी श्रीलंकाविरुद्ध संजूने अनेक वर्षानंतर पुनरागमन करत खेळलेल्या सामन्यातील पहिल्या चेंडूवर षटकार खेचला आणि कोहलीच नव्हे तर हजारो प्रेक्षकही प्रभावित केले. सामन्याच्या 11व्या ओव्हरमध्ये संदकनच्या चेंडूवर सॅमसनने पुढे येत जोरदार षटकार मारला. आणि जेव्हा चेंडूने बाउंड्री लाईन ओलांडली तेव्हा डगआऊटमध्ये आश्चर्यचकित झालेल्या कोहली फलंदाजाचे कौतुक करण्यासाठी उभा राहिला. पाहा हा व्हिडिओ:

दरम्यान, बांग्लादेशविरुद्ध घरच्या मालिकेत रिषभ पंत याच्या खराब कामगिरीमुळे चार वर्षांनंतर संजूची टीम इंडियात निवड करण्यात आली, मात्र त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सॅमसनचा समावेश करण्याची मागणी बर्‍याच दिवसांपासून सुरू होती. 2019 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये दुहेरी शतक झळकावल्यानंतर त्याचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला होता पण बांग्लादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. सॅमसनला सतत पंतच्या जागी संधी देण्याची मागणी केली जात होती.