रॉबिन सिंह (Photo Credit: @nitishh86/Twitter)

भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआय (BCCI) सध्या टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक आणि अन्य प्रशिक्षकांच्या शोधात आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि त्यांची टीम- फिल्डिंग आणि बॅटिंग कोच यांचा कार्यकाळ वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यापर्यंत वाढवण्यात आला आहे. भारतीय संघ 3 ऑगस्ट पासून विंडीज दौऱ्यावर असणार आहे. सुत्रांप्रमाणे मुख्य प्रशिक्षक आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफसाठी अनेक माजी क्रिकेटपटूंनी अर्ज केले आहेत. आणि आता त्यात टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रॉबिन सिंह (Robin Singh) यांचे देखील नाव शामिल झाले आहे. आयपीएल संघ, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चे साहाय्यक फिल्डिंग कोच यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. (टीम इंडियाच्या फील्डिंग कोच पदासाठी क्रिकेटविश्वातील या दिग्गज खेळाडूने केला अर्ज)

गॅरी कर्स्ट्न (Gary Kirsten) यांची प्रशिक्षकपदी निवड होण्यापूर्वी रॉबीन आणि गोलंदाज प्रशिक्षक वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी काही काळ भारतीय संघाला मार्गदर्श केले होते. 2007 ते 2009 या कालावधीत रॉबीन यांनी भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने 2007 मध्ये तिरंगी वनडे मालिका, पहिला टी-20 विश्वचषक आणि ऑस्ट्रेलियात वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. रॉबीन यांनी २००४ मध्ये भारताच्या 19 वर्षांखालील आणि २००६ मध्ये भारत 'अ' संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. रॉबिन हे परिश्रम आणि तंदुरुस्तीवर जोर देण्यासाठी ओळखले जातात.

दरम्यान, मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केल्यानंतर रॉबिन यांनी शास्त्री यांच्यावर कसून टीका केली आहे आणि त्यांना नुकतेच परत पडलेल्या विश्वचषकमधील भारताच्या सेमीफायनलमधील पराभवासाठी फटकारले आहे. रॉबिन म्हणाले, "शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला विश्वचषक सेमीफायनल फेरीत गाशा गुंडाळावा लागला. सलग दुसऱ्यांना भारतीय संघाला विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. शिवाय टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या मागील चार सत्रातही तोच अनुभव आला. ही वेळ 2023 च्या विश्वचषकच्या तयारीला सुरुवात करायची आहे आणि बदल संघाच्या फायद्याचे ठरेल.''

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या मार्गदर्शनाखालील त्रिसदस्यीत समिती यंदा मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे. या समितीत देव यांच्यासह माजी खेळाडू अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे.