PCB प्रमुख रमीज राजा (Photo Credit: PTI)

इम्रान खान (Imran Khan) यांची पाकिस्तानच्या (Pakistan) सत्तेतून हकालपट्टी केल्यानंतर पीसीबीचे (PCB) अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) देखील आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा रंगली आहे. पाकिस्तान क्रिकेट बॉर्डरचे (Pakistan Cricket Board) विद्यमान अध्यक्ष रमीज राजा हे इम्रान यांचे जवळचे मित्र असून, डेली जंगच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमीज राजा पंतप्रधान पदावरून खान यांच्या हाकालपट्टीनंतर ते देखील आपले पद सोडू शकतात. राष्ट्रीय सभेमध्ये अविश्वास ठराव गमावल्यानंतर खान यांना हटवण्यात आले आहे. सोमवारी पाकिस्तानच्या संसदेत नव्या पंतप्रधानांची घोषणा केली जाईल. इम्रान खान यांनी राजा यांच्याकडे क्रिकेट बोर्डाची जबाबदारी दिल्याचे सर्वानाच ठाऊक आहे. परंतु पाकिस्तानी मीडियानुसार, इम्रानचे सरकार कोसळण्यानंतर आता रमीज राजा यांचे जाणे देखील जवळपास निश्चित झाले आहे. (Pakistan Political Update: Shehbaz Sharif होणार पाकिस्तानचे नवे पंतप्रधान? विरोधकांनी एकजुटीने केलं PM पदासाठी नॉमिनेट)

सध्या मिळालेल्या वृत्तानुसार या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की रमीज राजा यांनी या संदर्भात आपल्या जवळच्या मित्रांशी सल्लामसलत केली आहे. दुबईत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सोबत झालेल्या बैठकीनंतर PCB प्रमुख आपल्या राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. राजा सध्या आयसीसीशी चर्चेसाठी दुबईत असून आज या बैठकीचा समारोप होणार आहे. सूत्रांनी सांगितले की पीसीबीमध्ये पुढील आठवड्यात, 11 एप्रिलपासून मोठे बदल अपेक्षित आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या आघाडीच्या वेबसाईटनुसार नजम सेठी यांचे विरोधी पक्ष आणि भावी पंतप्रधान मानले जाणारे शाहबाज शरीफ यांचे संबंध अतिशय मजबूत आहेत. सेठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात परतण्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे असे अहवालात सांगण्यात आले आहे. सेठी 2016 मध्ये सुरू झालेल्या पाकिस्तान सुपर लीगचे अध्यक्ष होते.

सेठीला पीसीबीमध्ये त्याच्या काही अपूर्ण योजना पूर्ण करायच्या असल्याचं अहवालात मानले जात आहे, ज्या त्यांच्या मते पाकिस्तान क्रिकेटसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांना त्यांच्याच कार्यकाळात सुरू झालेल्या पाकिस्तान सुपर लीगच्या ब्रँडमध्ये देखील खूप रस आहे. सेठी यांचे वैयक्तिक हितसंबंध या लीगशी निगडित असल्याचे स्पष्ट झाले असून आता सरकार बदलणार असताना त्यांना त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. विशेष म्हणजे तीन वर्षे, सात महिने आणि 23 दिवसांनंतर इम्रान खान यांनी रविवारी पहाटे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव गमावला. खान यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी राष्ट्रीय सभा आता 11 एप्रिलला मतदान करणार आहे. पाकिस्तानच्या 342 सदस्यीय सभागृहात रविवारी 174 सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले.