Pakistan Political Update: Shehbaz Sharif होणार पाकिस्तानचे नवे पंतप्रधान? विरोधकांनी एकजुटीने केलं PM पदासाठी नॉमिनेट
Shehbaz Sharif (PC - Twitter)

Pakistan Political Update: शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार आहेत, हे जवळपास निश्चित झाले आहे. विरोधकांनी एकजुटीने त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवले आहे. पाकिस्तानात सरकार पडल्यानंतरही इम्रान खान गप्प बसायला तयार नाहीत. पाकिस्तानमध्ये आज इम्रानच्या पक्षाचे कार्यकर्ते लाहोर, सियालकोट आणि कराचीमध्ये आंदोलन करणार आहेत. आज रात्री 8 वाजता लाहोरमध्ये, तर कराचीमध्ये 9 वाजता पीटीआय कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.

इम्रान खान यांची सत्ता गेल्यानंतर पाकिस्तानातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. इम्रान खान यांच्या बनी गाला येथील निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये पीटीआयकडून पंतप्रधानपदासाठी नव्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे. दुसरीकडे, नॅशनल असेंब्लीमध्ये संयुक्त विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार शाहबाज शरीफ यांचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. पीटीआय आपला पंतप्रधानपदाचा उमेदवारही लवकरच जाहीर करणार आहे. यानंतर पीटीआयच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल. (हेही वाचा - Pakistan: सरकार वाचवण्यासाठी Imran khan खोटे बोलले? 'परकीय षड्यंत्र' असल्याचा दावा अमेरिकेने फेटाळला)

पाकिस्तानची संसद सोमवारी 2 वाजता भरणार आहे. जेणेकरून नवीन पंतप्रधान निवडता येतील. शाहबाज शरीफ हे नवे पंतप्रधान बनणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या सगळ्यात शाहबाज शरीफ यांना मोठा झटका बसला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात शाहबाज शरीफ यांच्यावर उद्या आरोप होणार आहेत. त्यांना सोमवारी लाहोर उच्च न्यायालयात त्यांचा मुलगा हमजा शरीफ यांच्यासह समन्स बजावण्यात आले आहे.

परिणामी सर्वांच्या नजरा आता सोमवारी न्यायालयाकडे लागल्या आहेत. कारण, एकीकडे शाहबाज शरीफ यांची नॅशनल असेंब्लीमध्ये पंतप्रधानपदी निवड होणार आहे, तर दुसरीकडे मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्यावरचे आरोपही निश्चित होणार आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तान नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) ने डिसेंबर 2019 मध्ये शाहबाज शरीफ आणि त्यांच्या मुलावर मनी लाँड्रिंगचा आरोप करत कारवाई सुरू केली. त्यानंतर त्याच्या आणि त्याचा मुलगा हमजा यांच्या एकूण 23 मालमत्ता NAB ने जप्त केल्या. एवढेच नाही तर शाहबाजला सप्टेंबर 2020 मध्ये अटकही झाली होती. त्यांना काही दिवस तुरुंगवासही भोगावा लागला होता. गेल्या वर्षी लाहोर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. या प्रकरणाची सुनावणी सुरूच होती. आता यामध्ये आरोप निश्चित केले जाणार आहेत.