
Punjab Kings vs Delhi Capitals, TATA IPL 2025 58th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 58 वा सामना आज म्हणजेच 08 मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात धर्मशालातील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात येईल. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. पंजाब किंग्जचा संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि 11 सामन्यांत सात विजयांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना 'करो या मरो' असा आहे. जर दिल्लीचा आज पराभव झाला तर त्यांचे प्लेऑफमध्ये खेळण्याचे स्वप्न जवळजवळ संपुष्टात येईल.
हेड टू हेड रेकाॅर्ड (PBKS vs DC Head to Head)
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. आतापर्यंत दोन्ही संघांमधील सामने समान लढतीचे झाले आहेत. पंजाब किंग्जच्या संघाने 17 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्सने फक्त 16 सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळवण्यात आला होता. या दरम्यान पंजाब किंग्जने विजय मिळवला होता. दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकून त्यांची आकडेवारी सुधारायची आहे.
आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम
पंजाब किंग्जचा घातक अष्टपैलू मार्कस स्टोइनिसला आयपीएलच्या इतिहासात दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी 52 धावांची आवश्यकता आहे.
पंजाब किंग्जचा घातक सलामीवीर प्रभसिमरन सिंग आयपीएलच्या इतिहासातील त्याचा 100 वा टी-20 सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज केएल राहुलला टी-20 क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण करण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा स्टार गोलंदाज कुलदीप यादवला आयपीएलच्या इतिहासात 100 विकेट्स पूर्ण करण्यासाठी एका विकेटची आवश्यकता आहे.