PSL 2020: कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तान सुपर लीगलाही लागला ब्रेक, बाद फेरी शिल्लक असताना पीएसएल टी-20 लीग स्थगित
अधिकृत पीएसएल लोगो (@thePSLt20/Twitter)

पाकिस्तान सुपर लीगला (Pakistan Super League) स्थगित करण्याची घोषणा पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मंगळवारी केली. पीएसएल (PSL) 2020 मधील बाद फेरीतील सामना शिल्लक असताना स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. पीएसएलचे बाद फेरीचे सामने आज लाहोरमध्ये खेळले जाणार होते, तथापि, बुधवारच्या अंतिम सामन्यासह उर्वरित सामने रद्द करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरल होण्याचा धोका सतत वाढत आहे आणि याचा परिणाम क्रीडा जगावरही दिसून येत आहे. क्रिकेटसह अनेक क्रीडा सामने रद्द किंवा काही काळासाठी स्थगित केल्यावर आता पीएसएलवरही ब्रेक लागला आहे. यापूर्वी ही स्पर्धा लहान करून याचा अंतिम सामना 22 मार्चऐवजी 18 मार्चला खेळणे निश्चित केला गेला होता. अगदी पाकिस्तानातही कोरोना विषाणूने आपले पाय पसरवले आहे आणि वाईट आर्थिक परिस्थितीतून जात असलेला पाकिस्तान त्यास रोखू शकलेला दिसत नाही.

दरम्यान, कोरोनाच्या भीतीमुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द केली गेली किंवा पुढे ढकलण्यात आली परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी खेळाडूंनी यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी इंग्लंडचा अ‍ॅलेक्स हेल्स, जेसन रॉय, टाइमल मिल्स, लियाम डॉसन, लियाम लिविंगस्टोन, लुईस ग्रेगरी आणि जेम्स विन्स, वेस्ट इंडीजचा कार्लोस ब्रेथवेट, दक्षिण आफ्रिकेचा रिली रोसो आणि जेम्स फॉस्टर (कोच) यांनीही कोरोनामुळे पीएसएलमधून माघार घेतली आहेत. न्यूझीलंडचा मिशेल मैक्ग्लाशन आणि क्रिस लिन यांनी सेमीफायनल आधीच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीने केलेल्या ट्विटनुसार पीसीएल पुन्हा शेड्यूल केले जाईल. यापूर्वी रिक्त स्टेडियममध्ये पाकिस्तान सुपर लीगचे सामने आयोजित केले गेले होते.

पहिल्या उपांत्य सामन्यात मुल्तान सुल्तान्जचा सामना शावर जालमीशी होणार होता तर दुसर्‍या उपांत्य सामन्यात कराची किंग्ज आणि लाहोर कलंदर आमने-सामने येणार होते. यापूर्वी, बीसीसीआयने देखील 29 मार्चपासून सुरू होणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगित केली होती.