सरफराज अहमद याच्या हातून निसटणार Pakistan टेस्ट टीमचे कर्णधार पद, जाणून घ्या कोण होणार नवीन कर्णधार
सरफराज अहमद (Photo by Nathan Stirk/Getty Images)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर पाकिस्तान (Paksitan) क्रिकेट संघावर चहू बाजूने टीकेची झोड उठवली जाते आहे. सोशल मीडियावरही पाक संघाला ट्रोल केले गेले होते. कर्णधार सरफराज अहमद (Sarfraz Ahmed) याला देखील त्याच्या निर्णयासाठी आणि आळशीपणासाठी फटकारले गेले. 2015 मध्ये क्वार्टर फायनलमध्ये पोहचलेल्या पाकिस्तानी संघाला यंदा साखळी फेरीतच गाशा गुंडाळाव्या लागल्या. त्यामुळे पूर्ण संघ आणि कर्णधार अहमद याच्यावर जोरदार केली जात आहे. माजी पाकिस्तानी खेळाडू आणि 'रावळपिंडी एक्स्प्रेस' अशी ख्याती असलेला माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने तर अहमदकडून कर्णधार पद काढून घ्यावे असे म्हटले आहे. आणि आता असे दिसत आहे की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ने देखील सरफराजला कसोटी संघाच्या नेतृत्वातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. (अमेरिकेने नाकारला मोहम्मद शमीचा व्हिसा; BCCI च्या मध्यस्तीने भारतीय संघाची राखली लाज, जाणून घ्या प्रकरण)

जिओ न्यूज (Geo News) च्या वृत्तानुसार पीबीसीचा निर्णय सरफराजच्या विधानानंतर आला आहे, ज्यात त्याने राष्ट्रीय स्टेडियममध्ये पत्रकारांना सांगितले होते की, कर्णधारपद सोडण्याची त्याची इच्छा नाही. सरफराज म्हणाला की या प्रकरणात पीसीबीच निर्णय घेऊ शकते. 32 वर्षीय सरफराजने 13 टेस्ट सामन्यात पाकिस्तानचे कर्णधार पद समनभाळले आहे. यापैकी चार सामन्यात संघ विजयी झाला आहेत तर आठ सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अहवालानुसार, आयसीसी टेस्ट चॅम्पिअनशिप (ICC Test Championship) पूर्वी संघासाठी नवीन कर्णधार नेमण्याची पीसीबीची इच्छा आहे. पीसीबीची क्रिकेट समिती 2 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुरुष व महिला संघाच्या कामगिरीचा आढावा घेईल. दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार शान मसूद (Shan Masood) याला टेस्ट संघाचा नवा कर्णधार नियुक्त केले जाऊ शकते.

मसूदने 15 टेस्ट सामन्यात 26.43 च्या सरासरीने 797 धावा केल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध अखेरचा टेस्ट सामना खेळला होता. यात त्याने दोन अर्धशतके झळकावली होती. यंदाच्या विश्वचषकमध्ये पाकिस्तानी संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता. साखळी सामन्यात 11 गुणांसह पाकिस्तानी संघ पाचव्या क्रमांकावर होता.