अमेरिकेने नाकारला मोहम्मद शमीचा व्हिसा; BCCI च्या मध्यस्तीने भारतीय संघाची राखली लाज, जाणून घ्या प्रकरण
Mohammed Shami (Photo Credits: Facebook/ Mohammed Shami)

भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मोहम्मद शमी (Mohammed Shami) ओळखला जातो. विश्वचषक सामन्यात शमीने अतिशय उत्तम कामगिरी दाखवली होती. मात्र नुकतेच शमीबाबत घडलेल्या एका गोष्टीमुळे बीसीसीआय (BCCI) ची मान शरमेने खाली गेली आहे. मोहम्मद शमीला अमेरिकेने चक्क व्हिसा नाकारला होता. मात्र बीसीसीआयने मध्यस्ती करून होणारी फजिती वेळेत रोखल्याने या गोष्टीवर पडदा पडला आहे. शमीच्या वाईट आणि अपूर्ण पोलीस रेकॉर्डमुळे अमरिकेने हा व्हिसा नाकारला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या पडताळणीच्या नोंदी अपूर्ण असल्याचे आढळून आल्यानंतर, भारतीय खेळाडू मोहम्मद शमीचा व्हिसा अर्ज मुंबईतील अमेरिकी दूतावासाने सुरूवातीला फेटाळला होता. त्यानंतर बीसीसीआयला यामध्ये मध्यस्ती करावी लागली. बीसीसीआयच्या कार्यालयाने यात हस्तक्षेप करून, शमीने भारतासाठी केलेल्या उत्तम कामगिरीची यादी सादर केली. गेल्या दोन वर्षांपासून त्याचे पत्नीसोबत वैवाहिक विवादाच्या प्रकरणांचा संपूर्ण पोलिस अहवालही सादर केला गेला. या सर्व गोष्टींची पडताळणी झाल्यावर अखेर शमीचा व्हिसा मंजूर होण्यास मदत झाली.

भारतीय क्रिकेट संघ 29 जुलै रोजी मुंबईहून अमेरिकेसाठी रवाना होणार आहे. लॉडरहिल येथे वेस्ट इंडीज संघासोबत दोन टी -20 सामने पार पडणार आहेत. शमीला टी - 20 साठी निवडले गेले नसले तरी,  त्याला अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करण्याची आवश्यकता होती. कारण जमैका येथील दुसरी कसोटी संपल्यानंतर भारतीय संघ अमेरिकेमार्गे मायदेशी परतणार आहे.