On This Day in 2019: आजच्या दिवशी रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये ठोकले विक्रमी पाचवे शतक, सचिन तेंडुलकरची बरोबरी करत रचला होता इतिहास
रोहित शर्मा (Photo Credits: Getty Images)

आयसीसी वर्ल्ड कप (ICC World Cup) 2019 मध्ये टीम इंडियाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) मजबूत फॉर्ममध्ये होता. आजच्या दिवशी त्याने वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला होता. एकाच वर्ल्ड कपमधील सर्वोच्च शतकी खेळीचा हा विक्रम होता.रोहितने एकाच वर्ल्ड कपमध्ये विक्रमी पाचवे शतक ठोकले होते. यासह त्याने विश्वचषकात सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) सर्वोच्च शतकाच्या विक्रमाचीही बरोबरी केली. विश्वचषकातील रोहितचे हे सहावे शतक होते. 2019 विश्वचषकात रोहितने बांग्लादेशविरुद्ध 104, इंग्लंडविरूद्ध 102 पाकिस्तानविरूद्ध 140 आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 122 धावांचा शतकी डाव खेळला होता. यासह रोहित आणि सचिन यांनी वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 6 शतकं ठोकली आहेत. 6 जुलै 2019 रोजी झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने (Sri Lanka) नाणेफेक जिंकून सात विकेट गमावून 264 धावा केल्या. रोहितने 94 चेंडूंत 103 धावांची दमदार खेळी केली. रोहितने त्याच्या खेळीत 14 चौकार आणि दोन षटकार लगावले. केएल राहुलचीही त्याला चांगली साथ मिळाली आणि दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी झाली. रोहितशिवाय राहुलने 111 धावांची खेळी केली. (On This Day in 2019: रोहित शर्माने वर्ल्ड कप सामन्यात विक्रमी शतकासह बांग्लादेशला केले स्पर्धेतून आऊट, मोडला सौरव गांगुलीचा रेकॉर्ड)

दरम्यान, या शतकासह रोहितने श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा विक्रमही मोडला. 2015 ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड वर्ल्ड कप स्पर्धेत संगकाराने चार शतकं ठोकली होती. श्रीलंकेविरुद्ध रोहितने 103 धावांचा डाव खेळला आणि भारताला सोप्पा विजय मिळवून दिला. या खेळीने रोहितला स्पर्धेच्या धावसंख्येच्या शीर्षस्थानी नेले. स्पर्धेअखेरीस त्याने सर्वाधिक 648 धावा केल्या. श्रीलंकेविरुद्ध भारताचा हा अखेरचा ग्रुप स्टेज सामना होता. त्यानंतर सेमीफायनलमध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

दुसरीकडे, आयसीसी क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक 6 शतके ठोकण्याचा विक्रम तेंडुलकरच्या नावावर आहे. रोहितने त्या विक्रमाचीही बरोबरी केली. सचिनने 1992 ते 2011 दरम्यान सहा विश्वचषकात 45 सामने खेळले आणि सहा शतके ठोकली. विशेष म्हणजे रोहितने अवघ्या दोन विश्वचषकात सचिनची बरोबरी केली आहे. 2015 विश्वचषकात रोहितने एक शतक झळकावले होते आणि 2019 विश्वचषकात एकूण पाच शतके केली.