Rohit Sharma's 264 vs Sri Lanka: 13 नोव्हेंबर, 2014 रोजी रोहित शर्माने (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) 264 धावांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावांची नोंद केली. आज त्या विक्रमाची नोंद होऊन सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. व्हाइट-बॉल क्रिकेट सामन्यात विरोधी गोलंदाजीविरुद्ध आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता असलेला रोहितला आज सर्वांना चांगलाच परिचित आहे. रोहितच्या नावावर अनेक विक्रम आहेत पण एकदिवसीय क्रिकेटर म्हणून त्याचा वारसा क्रिकेटच्या इतिहासात कायमस्वरुपी राहील असा आहे. पन्नास षटकांच्या सामन्यात रोहितच्या 3 दुहेरी शतकांच्या (Rohit Sharma Double Centuries) विक्रमांना मोडणे भविष्यातील फलंदाजांना मुश्किल पडणार आहे. सचिन तेंडुलकरनंतर (Sachin Tendulkar) वनडे क्रिकेटमध्ये दुहेरी शतक करणारा रोहित दुसरा भारतीय होता, पण सचिनलाही पछाडत रोहितने वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आपल्या नावावर केला, ज्याच्या जवळ अद्याप कोणताही फलंदाज पोहचू शकलेला नाही. (IPL 2020 Final: रोहित शर्मा बनला आयपीएलचा 'किंग', CSKच्या या विक्रमाची केली बरोबर; पाहा फायनलमध्ये बनलेले 'हे' रेकॉर्ड)
रोहितने श्रीलंकेविरुद्ध 2014 वनडे सामन्यादरम्यान ईडन गार्डन्सवर 264 धावा केल्या. रोहितच्या या खेळीने हे सिद्ध केले की त्याला का 'हिटमॅन' म्हटले जाते. 264 धावांची खेळी करत रोहितने सचिन तेंडुलकरच्या नाबाद 200 आणि वीरेंद्र सेहवागच्या 219 धावांचा डाव मागे टाकला. वनडे कारकिर्दीतील हे त्याचे दुसरे दुहेरी शतक होते. त्याने आपल्या डावात 173 चेंडूंचा सामना करत 33 चौकार आणि 9 षटकार लगावले. विशेष म्हणजे रोहितने याआधी 2 नोव्हेंबर 2013 रोजी बेंगलोर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा द्विशतक झळकावले होते तर त्याने 13 डिसेंबर 2017 रोजी मोहाली येथे श्रीलंकेविरूद्ध तिसऱ्यांदा दुहेरी शतक करत नाबाद 208 धावा केल्या. पाहा 'हिटमॅन' रोहितच्या ऐतिहासिक डावाचे हायलाइट्स:
#OnThisDay in 2014, @ImRo45 created history by smashing 264 - the highest individual score in the ODIs 👊👌
A 🔝 knock that included 3⃣3⃣ fours and 9⃣ sixes 💥💥#TeamIndia
Watch that splendid knock here 👇📽️
— BCCI (@BCCI) November 13, 2020
दरम्यान, रोहित या सामन्याच्या अंतिम चेंडूवर नुवान कुलशेकरच्या चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. रोहितच्या स्फोटक डावामुळे टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 404 धावांचा डोंगर उभारला होता. भारतीय संघाच्या विशाल धावसंख्येचा प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 43.1 ओव्हरमध्ये 251 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताने 153 धावांनी सामना जिंकला.