सचिन तेंडुलकर (Photo Credit: Twitter/ICC)

आजच्या दिवशी अवघ्या 23 वर्षांपूर्वी श्रीलंका क्रिकेट टीमने (Sri Lanka Cricket Team) भारताविरुद्ध (India) कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करून इतिहास रचला. श्रीलंका क्रिकेटने केलेला तो विश्वविक्रम आजही कायम आहे. ऑगस्ट 1997 मध्ये भारतीय संघाने (Indian Team) श्रीलंकेचा दौरा केला, त्यावेळी दोन देशांमधील पहिले दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि नंतर वनडे मालिका खेळली गेली. आणि टेस्ट मालिकेचा पहिला ऐतिहासिक ठरला. मालिकेच्या पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेने भारतविरुद्ध कसोटी सामन्याच्या डावात टेस्ट इतिहासातील सर्वाधिक धावा केल्या. त्या सामन्याचा निकाल ड्रॉ झाला तरी जागतिक विक्रमाची आजही आठवण केली जाते. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्या 2 ऑगस्ट 1997 रोजी सुरू झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 167.3 ओव्हर फलंदाजी करताना 8 गडी गमावून 537 धावा केल्या आणि डाव घोषित केला.

सामन्याच्या दुसर्‍या दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारताने श्रीलंकेला फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताकडून या सामन्यात कर्णधार सचिन तेंडुलकरने 143, मोहम्मद अझरुद्दीनने 126 आणि नवजोत सिद्धूने 111 धावा केल्या. राहुल द्रविडनेही अर्धशतक ठोकले. टीम इंडिया सहज सामना जिंकेल असे वाटत असताना श्रीलंकेने भारताच्या विजयाच्या आशा पुसून काढल्या. श्रीलंकेच्या संघासमोर 500 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य होते आणि श्रीलंकेला 39 धावांवर पहिला झटका बसला. पण यानंतर सनथ जयसूर्या आणि रोशन महानामाने श्रीलंकेचा डाव पुढे नेला. दोघांनी अर्धशतक, नंतर शतक आणि त्यानंतर 200 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, जयसूर्याने शतक पूर्ण केले आणि थोड्या वेळाने महानमानेही आपले शतक पूर्ण केले. यानंतर दोघांच्यात सातत्याने भागीदारी सुरू राहिली आणि श्रीलंकेच्या संघाने भारताच्या स्कोरवर मात केली. श्रीलंकेच्या संघाची धावसंख्या 600 धावांच्या पार गेली असताना महानमा 225 धावा काढून बाद झाले. अशा प्रकारे या दोघांमध्ये एकूण 576 धावांची भागीदारी झाली. महानामा बाद झाल्यानंतर जयसूर्याही या धावांसंख्येवर बाद झाले.जयसूर्याने 340 धावा केल्या. त्यानंतर अरविंदा डीसिल्वाने प्रथम कर्णधार अर्जुन रणतुंगा आणि त्यानंतर महेला जयवर्धनेबरोबर भागीदारी केली. श्रीलंकेच्या संघाने या सामन्यात एकूण 271 षटके खेळली आणि 6 ऑगस्ट 1997 रोजी डाव घोषित करण्यापूर्वी 6 विकेट गमावून 952 धावा केल्या, जो आजपर्यंतचा विश्वविक्रम आहे. आजवर कोणत्याही टीमने टेस्ट सामन्याच्या डावात एवढी मोठी धावसंख्या उभारलेली नाही. यापूर्वी, 1932 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 903 धावा केल्या, परंतु कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच एका संघाने 950 हून अधिक धावा केल्या.