
Vignesh Puthur IPL: डावखुरा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरला रविवारी इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने प्रभावशाली खेळाडू म्हणून घोषित केले. त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरीने सर्वांना हादरवून सोडले. त्याच्या पहिल्याच षटकात विघ्नेशने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची महत्त्वाची विकेट घेतली. त्याने ऑफ-स्टंपच्या बाहेर फुल लेन्थचा चेंडू टाकला, ज्याचा झेल विल जॅक्सने झेलला.
त्यानंतर त्याच्या दुसऱ्या षटकात विघ्नेशने शिवम दुबेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुबेने लाँग-ऑनवर तिलक वर्माला झेल दिला. स्लॉग स्वीप करताना डीप स्क्वेअर लेगवर झेलबाद झाल्याने दीपक हुडा त्याचा तिसरा बळी ठरला. अवघा 23 वर्षाचा विघ्नेश पुथूर केरळमधील मलप्पुरम येथील आहे. मुंबई इंडियन्सने विघ्नेशला 30 लाखात खरेदी केले आहे.
विघ्नेश पुथूरने अद्याप केरळचे प्रतिनिधित्व केलेले नाही. तो केरळकडून 14 आणि 19 वर्षांखालील संघात खेळला आहे. याशिवाय, त्याने अॅलेप्पी रिपल्स संघासाठी केरळ क्रिकेट लीग (केसीएल) मध्ये भाग घेतला. जिथे त्याने तीन सामन्यांमध्ये फक्त दोन विकेट घेतल्या. यासोबतच त्याने तमिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्येही भाग घेतला आहे.