क्विंटन डी कॉक (Photo Credit: Twitter/IPL)

MI vs SRH, IPL 2020: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा (IPL) 17वा सामना खेळला जात आहे. आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. अशाप्रकारे मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 208 धावा केल्या आणि हैदराबादसमोर 209 धावांचे आव्हान दिले. मुंबईची सुरुवात चांगली झाली नसली तरी क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) डाव सावरला. डी कॉकने यंदाच्या आयपीएलमधील आपले पहिले अर्धशतक ठोकले आणि सर्वाधिक 67 धावा केल्या. ईशान किशन 31, सूर्यकुमार यादवने 27 धावा केल्या. कर्णधार रोहित आजच्या सामन्यात प्रभावी कामगिरी करू शकला नाही आणि 6 धाव करून माघारी परतला. हैदराबादकडून संदीप शर्मा (Sandeep Sharma) आणि सिद्धार्थ कौल यांनी प्रत्येकी 2, रशीद खानने 1 गडी बाद केला. (MI vs SRH, IPL 2020: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग XI)

शारजाह येथे खेळल्या जात असलेल्या आजच्या सामन्यात पुन्हा एकदा खेळाडूंनी चौकार-षटकारांचा पाऊस पडला. रोहितने सामन्यातील पहिला षटकार ठोकला, पण त्वरित पुढच्या चेंडूवर बाद झाला. कर्णधार स्वस्तात बाद झाल्यावर डी कॉक आणि सूर्यकुमार यादवने डाव सावरला, पण सूर्यकुमार डी कॉकला जास्त काळ साथ देऊ शकला नाही आणि कौलच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर डी कॉक आणि युवा किशनमध्ये अर्धशतकी भागीदारीने मुंबईला शंभरी गाठून दिली. मात्र नियमित अंतराने डी कॉक आणि किशन माघारी परतले. अखेर कीरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याच्या जोडीने मोठे फटके मारले आणि टीमला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. पोलार्ड 25 आणि कृणाल पांड्या 20 धावा करून नाबाद परतले. हार्दिक 28 धावा करून बाद झाला.

आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही तर हैदराबादने भुवनेश्वर कुमार आणि खालील अहमदच्या जागी अनुक्रमे संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौलला संधी दिली.