MI vs KXIP, IPL 2020: पंजाबचा खेळ खल्लास! मुंबई इंडियन्सने 48 धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत मिळवले अव्वल स्थान
मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

मुंबई इंडियन्सने टॉस गमावून पहिले फलंदाजी करून किंग्स इलेव्हन पंजाबला दिलेल्या 192 धावांच्या प्रत्युत्तरात केएल राहुलच्या पंजाबला 48 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. अबू धाबी येथे मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामन्यात पंजाबला 143 धावांपर्यंत मजल मारता आली. आजच्या सामन्यातील पराभव पंजाबचा तिसरा पराभव होता, तर मुंबईचा हा दुसरा विजय ठरला. यापूर्वी मुंबईला चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. या विजयासह मुंबईने पॉईंट्स टेबलमध्ये 4 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहेत, तर पंजाबची सहाव्या स्थानी घसरण झाली. दरम्यान, आजच्या सामन्यात पंजाबच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. मयंक अग्रवाल 25, राहुल 17, तर करुण नायरशून्यावर माघारी परतले. निकोलस पूरनने  सर्वाधिक 44 धावा केल्या. मुंबईने चेंडूने आज शिस्तबद्ध कामगिरी केली. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, जेम्स पॅटिन्सन यांनी प्रत्येकी 2 तर कृणाल पांड्याने 1 विकेट घेतली. (KXIP vs MI, IPL 2020: रोहित शर्माने 38वे अर्धशतक ठोकून केली सुरेश रैनाच्या रेकॉर्डची बरोबरी, चिमुरड्या समायराने असं केलं सेलिब्रेट, पाहा Photo)

मुंबईने दिलेल्या 192 धावांच्या प्रत्युत्तरात मयंक आणि राहुलच्या जोडीने जबरदस्त सुरुवात केली, पण बुमराहने बोल्ड करून टीमसाठी मोठे यश मिळवले. बुमराहने आजवरची आयपीएलमधील यशस्वी भागीदारी करणाऱ्या राहुल आणि मयंकची जोडी मोडली. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये चाहरने पंजाबचा कर्णधार राहुलला बोल्ड करून स्वस्तात माघारी पाठवले. करुण नायर भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर पूरनने ग्लेन मॅक्सवेलसोबत संघाचा डाव सावरला. पूरन मोठा डाव खेळत असताना पॅटिन्सनने त्याला विकेटकीपर क्विंटन डी कॉककडे कॅच आऊट केले. मॅक्सवेल देखील 11 धावांवर माघारी परतला. सरफराज खानने 7 धावा केल्या.

यापूर्वी, पहिले फलंदाजी करणाऱ्या मुंबईकडून कर्णधार रोहितने 45 चेंडूत 70 धावा केल्या, तर मागच्या मॅचचा हिरो इशान किशन 32 चेंडूत 28 रन करून आऊट झाला. त्यानंतर किरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि संघाला 191 धावांपर्यंत मजल मारून दिली. पोलार्डने 20 चेंडूत 47 रन केले, यामध्ये 4 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता, तर हार्दिकने 11 चेंडूत 30 धावा केल्या.