MI vs CSK IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या 27 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) होत आहे. सीएसकेने (CSK) पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 218 धावांची विशाल धावसंख्या उभारली. चेन्नईकडून अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) ताबडतोड फलंदाजी करत अवघ्या 27 चेंडूत 72 धावांची तुफानी खेळी खेळली, तर मोईन अलीने 36 चेंडूत 58 धावा केल्या. मुंबई इंडियन्सचा आघाडीचा गोलंदाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहचीही (Jasprit Bumrah) चेन्नईच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. बुमराहने आपल्या चार ओव्हरमध्ये 56 धावा लूटल्या आणि आयपीएलच्या (IPL) इतिहासातील एक नकोसा निर्विवाद विक्रम आपल्या नावावर केला. (MI vs CSK IPL 2021 Match 27: मोईन, फाफ डु प्लेसिस, रायुडूने केली गोलंदाजांची धुलाई, ‘पलटन’ विरुद्ध चेन्नईने उभारला 218 धावांचा डोंगर)
जसप्रीत बुमराहचे आतापर्यंतची आयपीएल मधील ही सर्वात महागडी ओव्हर ठरली आहे. सीएसके फलंदाजांपुढे बुमराह पूर्णपणे असहाय्य दिसत होता. सीएसके फलंदाजांनी त्याच्या चार ओव्हरयामध्ये चार षटकार आणि चार चौकार खेचले. 1/56 संख्या बुमराहची सर्वात महागडी ठरली पण मुंबईच्या वेगवान गोलंदाजाने यापूर्वी देखील धावा लुटल्या आहेत. बुमराहने 50 धावा किंवा त्याहून अधिक धावा देण्याची ही तिसरी घटना आहे. 2015 मध्ये दोन वेळा असे घडले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध बुमराहने 52 आणि दिल्ली कॅपिटल्सने 55 धावा ठोकल्या होत्या. बुमराहला मोईन अलीच्या रूपात एक विकेट मिळाली पण बुमराहसह अन्य मुंबईच्या वेगवान गोलंदाजांचीही जोरदार धुलाई झाली. ट्रेंट बोल्टच्या चार ओव्हरमध्ये 42 धावा आणि धवन कुलकर्णीच्या चार ओव्हरमध्ये चेन्नई फलंदाजांनी 48 धावा लुटल्या. संघासाठी सर्वोत्तम गोलंदाजी कीरोन पोलार्डने केली. पोलार्डने दोन ओव्हरमध्ये फक्त 12 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. रुतुराज गायकवाडची विकेट लवकर गमावल्यानंतर मोईन अली आणि फाफ डु प्लेसिसने सूत्रे हाती घेतली व शतकी भागीदारीसह दुसर्या विकेटसाठी 108 धावा जोडल्या.फाफ डु प्लेसिसने 28 चेंडूत 50 धावांची खेळी केली तर मोईनने 36 चेंडूत 58 धावा केल्या. सुरेश रैना मात्र काही खास कामगिरी करू शकला नाही आणि अवघ्या 2 धावांवरच तंबूत परतला. यानंतर अंबाती रायुडूने तुफानी फलंदाजी केली आणि अवघ्या 27 चेंडूत 72 धावा फटकावल्या व शेवटपर्यंत क्रीझवर उभा राहिला.
विशेष म्हणजे चेन्नईने मुंबईविरुद्ध आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या (218) उभारली आहे. बुमराहची तिसरी म्हणजे डावाच्या 17 व्या ओव्हरमध्ये रायुडूने 21 धावा चोपल्या. रायुडू आणि जाडेजाच्या अर्धशतकी भागीदारीने संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.