भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) लाचलुचपत प्रतिबंधक युनिटचे (ACU) प्रमुख काम केलेले माजी आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) अधिकारी नीरज कुमार (Neeraj Kumar) म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या लक्षात आले की, खेळाच्या प्रशासकांनी केलेल्या हेराफेरीच्या तुलनेत मॅच फिक्सिंग ही एक छोटीशी बाब आहे. नीरज कुमार हे 1 जून 2015 ते 31 मे 2018 पर्यंत एसीयु प्रमुख होते. आता त्यांनी आपल्या 'अ कॉप इन क्रिकेट' (A Cop in Cricket) या पुस्तकामध्ये अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव शेअर केले आहेत. हे पुस्तक 'जगरनॉट बुक्स'ने प्रकाशित केले आहे.
आपल्या पुस्तकात आपण देशात क्रिकेटच्या नावाखाली सुरू असलेल्या 'हेराफेरी'ची माहिती वाचकांना देण्याचा प्रयत्न केला आहे, असे ते म्हणतात. त्यांनी पुस्तकात लिहिले आहे की, मी बीसीसीआयमध्ये तीन वर्षे घालवली आणि यादरम्यान मला जाणवले की क्रिकेटमधील भ्रष्टाचाराच्या तुलनेत फिक्सिंगचा भाग फारच छोटा आहे. इंडियन प्रीमियर लीगमुळे क्रिकेटमध्ये भरपूर महसूल येतो आणि तो राज्य क्रिकेट असोसिएशनशी शेअर केला जातो.
क्रिकेट प्रशासकांच्या हेराफेरीचे प्रकरण जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये घडले. 2015 मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या राज्य युनिटच्या प्रशासकांविरुद्ध कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता. कुमार यांनी पुढे असाही दावा केला की, बीसीसीआयमधील त्यांच्या कार्यकाळात, त्यांच्या युनिटकडे अशा अनेक तक्रारी आल्या, ज्यामध्ये काही तरुण क्रिकेटपटूंकडे शारीरिक संबंधांची मागणी केली होती. (हेही वाचा: स्टिंग ऑपरेशन वादात सापडल्यानंतर बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा)
ते पुढे म्हणाले, 'खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी आमच्याकडे अनेकदा तक्रार केली की, प्रशिक्षक किंवा अधिकाऱ्यांनी त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. ज्यामध्ये खेळाडूंना आयपीएल किंवा रणजी संघात स्थान देण्याचे आश्वासन दिले आणि नंतर गायब झाले.' कुमार यांनी पुस्तकात असेही नमूद केले आहे की, 2017 मध्ये बीसीसीआयचा कारभार हाती घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय आणि बीसीसीआयचे तत्कालीन सीईओ राहुल जोहरी यांचे पिता-पुत्राचे नाते होते. जिथे वडील मुलाच्या गलथान कारभाराबाबत काहीही करत नव्हते. जोहरीच्या अनेक कृत्यांवर राय यांनी पडदा टाकला.