टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याची आई देवकी देवी (Devki Devi) आणि वडील पान सिंह धोनी (Pan Singh Dhoni) यांना कोविड-19 ची लागण झाली आहे. दोघांनाही बरियातू रोड वरील पल्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (Pulse Superspeciality Hospital) दाखल करण्यात आले आहे. देवकी देवी आणि पान सिंह धोनी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी दिली आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसांपर्यंत पोहचला नसून त्यांची ऑक्सिजनची पातळी देखील चांगली आहे. त्यामुळे कोविड संसर्गातून ते लवकरच बरे होतील, अशी आशा आहे.
सध्या महेंद्र सिंह धोनी आयपीएल मध्ये व्यस्त आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करत आहे. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 3 सामने खेळले असून त्यापैकी 2 सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. अंकतालिकेत चेन्नई सध्या तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आज संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
दरम्यान, झारखंड मध्ये मंगळवारी 4969 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 1,72,315 इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण 1,37,590 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोना व्हायरसची दुसरी लाट देशात थैमान घालत आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृतांचा आकडाही वाढत आहे. आज देशात 2,95,041 नव्या रुग्णांची उच्चांकी वाढ झाली असून 2,023 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, 1,67,457 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 21,57,538 सक्रीय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे 13,01,19,310 रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.