भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) गेल्या वर्षी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या महेंद्रसिंह धोनी हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे (Chennai Super Kings) नेतृत्व करत आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघाने आतापर्यंत आयपीएलचे तीन खिताब जिंकले आहेत. परंतु, धोनी लवकरच आयपीएलमधूनही निवृत्ती घेईल, असा अंदाज इंग्लडच्या माजी कर्णधार मायकेल वॉन (Michael Vaughan) यांनी वर्तवला आहे. यामुळे चेन्नईच्या संघाने कर्णधार पद संभाळण्यासाठी योग्य खेळाडू शोधायला हवा आहे, असेही ते म्हणाले आहेत.
मायकल वॉन यांच्या मते महेंद्रसिंहनंतर सीएसकेच्या कर्णधार पदाची जबाबदारी रविंद्र जाडेजा संभाळू शकतो. कारण, रविंद्र जाडेजा चांगली फलंदाजी करतो. तसेच त्याची गोलंदाजीही चांगली आहे. याशिवाय, क्षेत्ररक्षण करण्यात देखील माहिर आहे. याशिवाय त्याची मानसिकता खूप चांगली असल्यामुळे धोनीनंतर जाडेजा सीएसकेचा कर्णधार होऊ शकतो, असा विश्वास मायकल वॉन यांनी व्यक्त केला आहे. तसेच, रविंद्र जाडेजा कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तसेच विरोधी संघाकडे पाहून तुम्ही गोलंदाजीची सुरूवात सुद्धा त्याच्यापासून करू शकता आणि क्षेत्ररक्षणालाही त्याला महत्त्वाच्या ठिकाणी ठेवू शकता, असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- IPL 2021: आयपीएल 2021 मधील महेंद्र सिंह धोनीची स्टम्पमागची कॉमेंट्री ऐकलीत का? पाहा गंमतीदार व्हिडिओ
जाडेजाकडे नेहमीच एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून पाहिले जाते. राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्यात जाडेजाने सीएसकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. या सामन्यात त्याने जॉस बटलर, शिवम दुबे यांना माघारी धाडले होते. याचबरोबर 4 महत्वाच्या झेल घेतल्या होत्या.