भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक टी-20 सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सध्या ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे आणि शेवटचा टी-20 जो संघ जिंकेल तो 2-1 ने मालिका जिंकेल. टीम इंडियाने पहिला सामना 6 विकेटने जिंकला होता, तर विंडीजने दुसऱ्या सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली होती. पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 200 पेक्षा अधिक धावा लुटलेल्या, तर दसऱ्या मॅचमध्ये गोलंदाज विंडीज फलंदाजांची विकेट घेण्यासाठी संघर्ष करताना दिसले. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे की कोहली आणि कंपनी या मॅचमध्ये कसे प्रदर्शन करतात. फलंदाजी ही भारतासाठी कधीच समस्या नव्हती. सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) मागील दोन्ही सामन्यात अपयशी ठरला होता पण आता त्याला होम ग्राऊंडवर मोठा डाव खेळायला आवडेल. केएल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने धावा केल्या आहेत. पहिले टी-20 अर्धशतक झळकावणाऱ्या शिवम दुबे (Shivam Dube) याने आक्रमक खेळी केली त्यामुळे, त्याच्याकडून पुन्हा टीम इंडियासाठी मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. (IND vs WI 3rd T20I: युजवेंद्र चहल ला वानखेडे सामन्यात भारताचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज बनण्याची संधी, 'हा' नकोश्या रेकॉर्डचीही होऊ शकते नोंद)
कर्णधार कोहलीलाक्षेत्ररक्षणाचीही चिंता असेल. शेवटच्या सामन्यात त्याने लेंडल सिमन्स याचा सहज झेल सोडला. परिणामी त्याने 45 चेंडूत 67 धावा फटकावल्या आणि वेस्ट इंडिजच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली. दुसरीकडे, विंडीजसाठी वानखेडे स्टेडियम लकी आहे. वेस्ट इंडीजने या मैदानावर दोन सामने खेळले आहेत आणि दोन्हीमध्ये शानदार विजय नोंदविला आहे. 2016 च्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात विंडीजने इंग्लंडला सहा विकेट आणि त्यानंतर भारताला सात गडी राखून पराभूत केले होते.
असे आहे भारत आणि विंडीज संघ:
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मनीष पांडे, केएल राहुल, संजू सॅमसन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
वेस्ट इंडीज: किरोन पोलार्ड (कॅप्टन), निकोलस पूरन, फॅबियन एलन, शेल्डन कोटरेल, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, ब्रॅंडन किंग, एव्हिन लुईस, किमो पॉल, खेरी पियरे, दिनेश रामदिन (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, लेंडल सिमंस, केसरीक विल्यम्स, हेडन वाल्श जूनियर.