KXIP vs DC, IPL 2020: शिखर धवनने सलग दुसरी सेन्चुरी करत केला दमदार विक्रम, 'हा' पराक्रम करणारा बनला पहिलाच फलंदाज
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Photo Credit: PTI)

Shikhar Dhawan Consecutive Centuries in IPL: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 'गब्बर' म्हणजेच शिखर धवनने (Shikhar Dhawan) धमाका केला आहे. आयपीएल (IPL) 2020 मध्ये त्याने सलग दुसरे शतक ठोकले. धवनने आयपीएल 2020 च्या 38व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) या मोसमातले दुसरे शतक झळकावले आहे. धावांच्या आयपीएल करिअरमधील हे दुसरे शतक देखील ठरले. यापूर्वी धवनने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध नाबाद 101 धावा केल्या होत्या. आणि आता पंजाबविरुद्ध शतक ठोकत दमदार विक्रमाची नोंद केली. धवन आयपीएलच्या इतिहासात एकाहून अधिक शतक ठोकणारा 14वा फलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये 2 शतक ठोकणारा धवन 9वा फलंदाज ठरला आहे. धवनने 57 चेंडूत शतक ठोकत कमाल केली. इतकंच नाही तर शिखर धवन आयपीएलच्या इतिहासात सलग 2 सामन्यात शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. (KXIP vs DC, IPL 2020: 'गब्बर' धमाका! शिखर धवनने ठोकले सलग दुसरे आयपीएल शतक, दिल्ली कॅपिटल्सचे किंग्स इलेव्हनसमोर 165 धावांचे आव्हान)

दुसरीकडे, किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यादरम्यान धवनने आयपीएलमध्ये 5000 धावाही पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये 5000 धावा करणारा तो एकूण पाचवा तर चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. धवनपूर्वी ही कामगिरी विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा आणि डेविड वॉर्नर यांनी केली आहे. धवन आयपीएलमधील सर्वाधिक धावांच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. धवनच्या खात्यात आता 5044 धावा आहेत. धवनने 169 सामन्यात 35.02 च्या सरासरीने आणि 126.70 च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या आहेत. या हंगामाआधी धवनने एकही शतक केले नव्हते आणि आता त्याच्या खात्यात दोन शतकांची नोंद झाली आहे.

शिवाय, शिखर धवनने या मोसमात 400 धावा पूर्ण केल्या आहेत. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल हा एकमेव फलंदाज आहे ज्याने या मोसमात 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. धवनच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने 20 ओव्हर पाच गडी गमावून 164 धावा केल्या. धवनने 61 चेंडूंत 12 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 106 धावा केल्या. या खेळीमुळे धवन यावर्षी ऑरेंज कॅप शर्यतीत दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. धवनने आता 10 सामन्यात 66.42 च्या सरासरीने 465 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्ससाठी धवनशिवाय इतर कोणताही फलंदाज काही खास करू शकला नाही. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी 14-14 धावा केल्या.