शिखर धवनचे नाबाद अर्धशतक (Photo Credit: PTI)

KXIP vs DC, IPL 2020: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सत्राचा 38वा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळला जात आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात टॉस जिंकून दिल्लीने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. अशा स्थतीत डीसीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 164 धावा केल्या आणि किंग्स इलेव्हनसमोर 165 धावांचे आव्हान दिले. किंग्स इलेव्हनविरुद्ध आजच्या सामन्यात दिल्लीसाठी पुन्हा एकदा सलामी फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) धमाकेदार बॅटिंग केली आणि आयपीएलमधील सलग दुसरे शतक ठोकले. धवन 61 चेंडूत नाबाद 106 धावा करून परतला. धवन वगळता श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी प्रत्येकी 14 तर पृथ्वी शॉ 7 धावाच करू शकला. मार्कस स्टोइनिसने 9 धावा केल्या. दुसरीकडे, धवनने शतक ठोकले असले तरीही किंग्स इलेव्हन गोलंदाजांनी दिल्लीच्या धावांवर लगाम लावली आणि त्यांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) 2, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स नीशम आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. (Shikhar Dhawan Completes 10 Years with Team India: टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दशक पूर्तीबाबत ट्विट करताना शिखर 'गब्बर' धवन भावुक)

टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला नीशमने चौथ्या ओव्हर शॉला स्वस्तात बाद करून धक्का दिला. त्यानंतर धवन आणि कर्णधार श्रेयस डाव सावरत असताना एम अश्विनने विकेटकीपर केएल राहुलकडे श्रेयसला कॅच आऊट केले. मागील दोन सामन्यांना मुकलेला रिषभ पंतही मोठा डाव खेळू शकला नाही आणि मॅक्सवेलच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मयंक अग्रवालकडे कॅच आऊट झाला. यांनतर धवनने एकाबाजूने मोठे फटके खेळणे सुरूच ठेवले आणि यंदाच्या आयपीएलमधील आपले तिसरे अर्धशतक पूर्ण केले. स्टोइनिस देखील धवनला जास्त काळ साधं देऊ शकला नाही आणि शमीच्या गोलंदाजीवर मयंककडे झेलबाद झाला. यानंतर धवनने 57 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकार लगावत सलग दुसरे शतक ठोकले. आयपीएलमध्ये सलग दोन सामन्यात शतक करणारा धवन पहिलाच फलंदाज ठरला.

दुसरीकडे, पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीने 9 पैकी 7 मॅच जिंकल्या आहेत, तर पंजाबला 9 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले असून 6 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा आहे. गुणतालिकेत पंजाब सातव्या क्रमांकावर आहे आणि आयपीएल प्ले-ऑफमधील शर्यतीत कायम राहण्यासाठी पंजाबला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे.