Ranji Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळणारे भारतीय संघातील अनेक खेळाडू सध्या रणजी ट्रॉफीमध्ये आपली ताकद दाखवत आहेत. यामध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा सारखे खेळाडूंचा समावेश आहे. आता अशी बातमी येत आहे की भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल देखील लवकरच कर्नाटककडून रणजी ट्रॉफी खेळताना दिसू शकतो. (हेही वाचा - ICC Women's ODI Cricketer of The Year: भारतीय खेळाडू Smriti Mandhana ठरली आयसीसी महिला वनडे 'क्रिकेटर ऑफ द इयर'; दुसऱ्यांदा जिंकला पुरस्कार)
केएल राहुल रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटककडून खेळेल का?
केएल राहुल आता रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या ग्रुप स्टेज सामन्यात कर्नाटककडून खेळताना दिसणार आहे. हा सामना 30 जानेवारीपासून बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हरियाणा विरुद्ध खेळला जाईल. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) चे अध्यक्ष रघुराम भट यांनी टाइम्सऑफइंडिया डॉट कॉमशी बोलताना राहुलच्या उपलब्धतेची पुष्टी केली. भट्ट म्हणाले, "मी सध्या बेंगळुरूमध्ये नाही, पण मिळालेल्या माहितीनुसार, केएल राहुल या महत्त्वाच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल."
केएल राहुल रणजी ट्रॉफी विक्रम
केएल राहुलने रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटकसाठी शानदार कामगिरी केली आहे. 2013-14 च्या हंगामात त्याने तीन शतके आणि तीन अर्धशतकांसह एकूण 1033 धावा केल्या. त्या हंगामाच्या अंतिम सामन्यातील कामगिरीसाठी त्याला "सामनावीर" हा किताबही मिळाला. 2014-15 च्या हंगामात, राहुलने उत्तर प्रदेशविरुद्ध 337 धावा केल्या, जे कर्नाटकचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले त्रिशतक होते. त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत, केएल राहुलने आतापर्यंत 103 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 7262 धावा केल्या आहेत. यामध्ये 18 शतके आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे आणि त्याची फलंदाजीची सरासरी 42.71 आहे.
इतर खेळाडूही मैदानात उतरतील
केएल राहुल व्यतिरिक्त, इतर अनेक मोठे खेळाडू देखील पुढील फेरीत रणजी ट्रॉफीमध्ये भाग घेतील. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हैदराबादकडून खेळेल, तर माजी भारतीय कर्णधार विराट कोहली 13 वर्षांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. रवींद्र जडेजा तंदुरुस्त आहे आणि सौराष्ट्र संघाकडून आसामविरुद्धचा सामना खेळण्यास सज्ज आहे. त्याच वेळी, दुखापतीतून बरे झाल्यानंतर रियान पराग देखील या सामन्यात पुनरागमन करेल.