आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिला ‘आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार’ (ICC Women's ODI Cricketer of The Year Award) जाहीर केला आहे. वर्ष 2024 मधील एकदिवसीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे मंधाना आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर ठरली आहे. तिने या पुरस्काराच्या शर्यतीत असलेल्या श्रीलंकेच्या चमारी अटापट्टू, ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँड आणि दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड यांना पछाडले आहे. गेल्या वर्षी या तिन्ही खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट होती. मात्र गेल्या वर्षी मंधानाची महिला वनडे क्रिकेटमधील कामगिरी उत्कृष ठरली.
स्मृती मंधानाची खेळी-
स्मृतीने गेल्या वर्षी एकूण 13 सामने खेळले, ज्यामध्ये ती 57.46 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 95.15 च्या मजबूत स्ट्राइक रेटने 747 धावा करण्यात यशस्वी ठरली. या काळात तिने 4 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली. मंधानाने जूनमध्ये दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्ध 2 शतके आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी 1 शतक झळकावले होते.
Smriti Mandhana Named ICC Women's ODI Cricketer of The Year:
For the second time, one of the leading stars of the game takes out the ICC Women’s ODI Cricketer of the Year award 🌟 pic.twitter.com/LJbgA8OobX
— ICC (@ICC) January 27, 2025
पुरस्कार पटकावणारी दुसरी महिला-
मंधानाने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी 2018 मध्येही तिने हा पुरस्कार पटकावला होता. अशाप्रकारे, दोनदा हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय आणि जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. न्यूझीलंडच्या सुझी बेट्सनेही हा पुरस्कार दोनदा पटकावला आहे. मंधानाचा हा चौथा आयसीसी पुरस्कार आहे. (हेही वाचा: Tilak Verma Milestone: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिलक वर्माने रचला एक खास विक्रम, विराट कोहलीचा विक्रम काढला मोडीत)
स्मृती मंधाना कारकीर्द-
मंधानाने 2013 मध्ये बांगलादेश महिला क्रिकेट संघाविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात केली. आतापर्यंत तिने 97 एकदिवसीय सामन्यांमध्ये 46.25 च्या सरासरीने आणि 87.63 च्या स्ट्राइक रेटने 4,209 धावा केल्या आहेत. या काळात तिने 10 शतकांव्यतिरिक्त 30 अर्धशतकेही केली आहेत. तिची सर्वोत्तम धावसंख्या 136 धावा आहे. यासह 2024 साली महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ती सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती.